कोकण भवनवर एल्गार
नवी मुंबई : केंद्र सरकारने नोटाबंदी करुन देशाचे आणि सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतानाच राज्यातील युती सरकारने गोरगरीब जनता व शेतकर्यांना वेठीस धरले आहे. या नाकर्त्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार लोकनेते गणेश नाईक, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत सोमवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नवी मुंबईतील कोकण भवनवर ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी दिली आहे.
सत्ताधार्यांच्या नाकर्तेपणामुळे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा?’, अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई, फसव्या योजना, शिक्षणाचे बाजारीकरण, वाढती गुन्हेगारी, महिलांची असुरक्षितात अशा अनेक प्रश्नांवर हल्लाबोल आंदोलनातून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील युती सरकारच्या कालखंडात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे व धार्मिक स्थळांवर होणारी कारवाई, बंद करण्यात आलेली प्रकल्पगस्तांची १२.५ टक्के योजना, सिडकोच्या भुखंडांचे रखडलेले हस्तांतरण, प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्याचे सिडकोने थांबविलेले विद्यावेतन, वाढती गुन्हेगारी आणि बंद न झालेले टोलनाके या विरोधात देखील हल्लाबोल आंदोलनात सरकारचा धिक्कार करण्यात येणार आहे.
—————————————————————————–
नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, सर्व सेलचे पदाधिकारी आणि पक्ष कार्यर्त्यांनी तसेच तमाम नवी मुंबईकरांनी सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलनात सहभागी व्हावे आणि जनतेला न्याय द्यावा.
– अनंत सूतार
जिल्हाध्यक्ष नवी मुंबई, राष्ट्रवादी