विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून दिलीप माने यांची उमेदवारी दाखल
मुंबई : येत्या ७ डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत ‘अदृश्य बाण’ चालून चमत्कार घडून येईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून दिलीप माने यांचा अर्ज दाखल केल्यानंतर विधानभवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी, हमीभाव आदी मुद्यांवर शिवसेना सतत सरकारविरूद्ध नाराजी व्यक्त करते आहे. काल-परवाच त्यांनी सत्ता सोडण्याचाही इशारा दिलेला आहे. एकंदर राजकीय परिस्थिती पाहता या पोटनिवडणुकीत ‘अदृश्य बाण’ चालून विरोधी पक्षांचे उमेदवार दिलीप माने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदींसह सर्व समविचारी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा अर्ज दाखल करतेवेळी खा. अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री नसिम खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. हेमंत टकले, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.