नवी मुंबई: जुईनगर येथील बँक ऑफ बडोदावरील दरोडा प्रकरणात अटकेत असलेल्या हाजीद अली सबजर अली मिर्झा बेग या संशयित आरोपीला वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात वैद्यकिय तपासणीसाठी नेले असताना, त्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या हाताला झटका देऊन रुग्णालयातील कपाटावर स्वत:चे डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
यात हाजीद अली जखमी झाला असून वाशी पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणे आदि कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर येथील शाखेवर दरोडा पडल्यानंतर सानपाडा पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून हाजीद अली सबजर अली मिर्झा बेग याच्यासह चौघांना अटक केली आहे. त्यामुळे सध्या हाजीद अलीसह त्याचे इतर साथीदार पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी रात्री हाजीद अली याला वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात नियमित वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हाजीद अली याला रुग्णालयातील अपघात विभागात नेले असताना, त्याच्यासोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस हवालदार गणपत पावार आणि पोलीस शिपाई चंद्रभान पाटील या दोघांच्या हाताला झटका देऊन हाजीद अली याने पळ काढला. त्यानंतर त्याने अपघात विभागात असलेल्या काचेच्या कपाटावर आपले डोके आपटून तसेच आपले अंग झोकून देऊन स्वत:ला दुखापत करुन घेतली.
सदर घटनेनंतर बंदोबस्तावर असलेल्या दोघा पोलिसांनी त्याची धरपकड करुन त्याला अटकाव केला. त्याच्यावर तेथेच उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली. सदर घटनेनंतर वाशी पोलिसांनी आरोपी हाजीद अली याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करणे तसेच सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे आदि कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.