मुंबई : काँग्रेस पक्षाच्या अनुसुचित जाती विभागाच्या वतीने बुधवार दि.२९ नोव्हेंबर पासून ‘सामाजिक परिवर्तन अभियान’ राबविले जाणार असून या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातून केली जाणार असल्याची माहिती काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष व प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांनी दिली आहे.
या अभियाना विषयी माहिती देताना डॉ.वाघमारे म्हणाले भाजप शिवसेना सरकारने मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी असलेल्या विविध योजना बंद केल्या असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही बंद केली आहे. हे सरकार मागासवर्गीय समाजाची प्रगती होऊ नये यासाठी प्रयत्न करत असून सरकार विरोधात या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
तसेच विविध राजकीय पक्षात विभागलेल्या मागासवर्गीय समाजातील लोकांना काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली आणून पक्षाची ताकद वाढविण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून केले जाणार आहे. दि.२९ नोव्हेंबर रोजी पासून विदर्भातील अमरावती जिल्ह्यांतून या अभियानाची सुरुवात केली जाणार असून गुरुवार दि.३० नोव्हेंबर रोजी अकोला, १ डिसेंबर रोजी वाशिम तर २ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार असल्याचे डॉ.राजू वाघमारे यांनी सांगितले.