संघर्ष समितीने घेतला आक्रमक पवित्रा
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
पनवेल: पेट्रोल-डिझेलमधील भेसळ नियंत्रणात आल्यानंतर पंप चालकांनी मापात पाप करण्याचे सूत्र अवलंबिल्याने वाहन चालक, मालकांची लूट सुरू आहे. वजन, मापे नियंत्रण अधिकाऱ्यांनी त्यांना चाप लावून पेट्रोल पंपांवर होणारी लूट त्वरित थांबबावी, असे आदेश तहसीलदार दीपक आकडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पनवेल तालुक्यातील विविध कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर मापात काळंबेरं होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी यावरून हाणामारीच्या घटना घडल्याची नोंदही पोलिस ठाण्यात आहे. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी तहसीलदार दीपक आकडे यांना पत्र पाठवून संबंधीतांची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. त्यानुसार काल, मंगळवारी (दि. 28) आकडे यांच्या दालनात झाली.
वजन, मापे नियंत्रण विभागाचे अधिकारी भंगारे यांनी पनवेल शहर व तालुक्यात 34 पेट्रोल पंप असल्याची माहिती दिली. गेल्या सहा महिन्यापूर्वी ठाणे येथील गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी आणि आमच्या पथकाने संयुक्तपणे तपासणी मोहीम राबविली असल्याची माहिती बैठकीत दिली.
यावर संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आक्षेप नोंदविला आणि ही मोहीम सातत्याने राबविली गेल्यास पेट्रोल पंप चालकांवर वचक राहील. वजन, मापे नियंत्रण विभागाला कधी तरी जाग येतेच कशी, असा रोखठोक प्रश्न विचारताच अधिकारी गर्भगळीत झाले.
पेट्रोल पंपांवर मालक अनेकदा डिझेल, पेट्रोल नसल्याचे फलक लावून वाहनचालकांची दिशाभूल करीत आहेत. ते खातेदारांना काळ्याबाजाराने आणि तेही उधारीवर डिझेल देवून कृत्रिम डिझेल टंचाई निर्माण करतात असे निदर्शनास आणून दिले. पेट्रोल पंप चालक ऐनकेन प्रकारे वाहन चालकांची लुबाडणूक करीत असल्याने ती थांबवण्यात यावी, अशी मागणी संघर्षने लावून धरली.
आकडे यांनी, ही लूट थांबविण्याचे आदेश देताना सर्व पंप आणि त्यांचे मीटर सखोलतेने तपासून घ्यावेत. मोहिमेत आपण आणि संघर्ष समिती सदस्य सहभागी होऊ. तसेच महिनाभरात सर्व पेट्रोल पंप तपासून त्याचा अहवाल सादर करावा, असे आकडे यांनी निर्देश दिले.
या बैठकीत वजन, मापे नियंत्रणचे निरीक्षक रमेश मारणे, सु. प्र. भंगाळे , पुरवठा विभागाचे राठोड, बीपीएल कंपनीचे वितरक पाटील तसेच संघर्षचे कांतीलाल कडू, माधुरी गोसावी,चंद्रकांत शिर्के, मंगल भारावड, भारती जळगावकर, किरण तळेकर, विक्रम रमाधरणे, पिरमभाई पटेल आदी जण उपस्थित होते.