मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि विधान परिषद निवडणुकीसाठीचे भाजप शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार प्रसाद लाड यांनी बुधवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपल्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभार मानण्यासाठीची ही सदीच्छा भेट असल्याची प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
येत्या ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केल्यामुळे आता लाड यांचा विजय म्हणजे निव्वळ औपचारिकता राहिल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याबाबत आभार मानण्यासाठी बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सदीच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी लाड यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर मातोश्रीबाहेर माध्यमांशी बोलताना लाड म्हणाले की, ‘भाजप आणि शिवसेनेसह सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांच्या मतांच्या जोरावर माझा विजय निश्चित आहेच, मात्र त्याशिवाय विरोधकांकडील अधिकची किमान पंधरा मते आपल्याला मिळतील. तसेच या निवडणुकीत ‘अदृश्य बाण’ नेमके कुणाला मदत करतील हे देखील निकालानंतरच विरोधकांना कळेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. विधान परिषद निवडणुकीत आपल्याला अदृश्य बाणांची मदत होईल, अशा स्वरूपाचे विधान काही दिवसांपुर्वी चव्हाण यांनी केले होते, त्या विधानाचा संदर्भ लाड यांच्या वक्तव्याला होता.