दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबई आणि कामोठेमध्ये फेरीवाल्यांना मनसैनिकांनी दिलेला चोप यामुळे वातावरण तणावाचे असतानाच सीबीडी पोलिसांनी आज बेलापुरमधील मनसेच्या पदाधिकार्यांना नोटीसा दिल्या आहेत. तथापि प्रथम रेल्वे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांना हटवा व त्यानंतरच आम्हाला कायदा सांगा अशी प्रतिक्रिया देत मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी हम नही सुधरेगे अशी प्रतिक्रिया दिल्याने मनसे व फेरीवाल्यातील वाद चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई व पनवेल कार्यक्षेत्रात फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने अभियान उघडले आहे. त्यातच मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी सातत्याने अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उघडल्याने कोपरखैरंणेतील एका फेरीवाल्यांच्या नेत्यांने त्यांना दमदाटी करत धमकीही नुकतीच दिली आहे.
सीबीडी पोलिसांनी मनसे पदाधिकार्यांना दिलेल्या नोटीशीमध्ये जमावबंदी तसेच कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करण्यास सांगितले आहे. तथापि उच्च न्यायालयाचा रेल्वे स्थानक, शाळा, हॉस्पिटल तसेच धार्मिक स्थळापासून १० ते १५० मीटरच्या अंतरात फेरीवाल्यांनी बसू नये असे आदेश दिलेला असताना फेरीवाले व्यवसाय करत आहे. पोलिसांनी प्रथम त्यांना कायदा शिकवावा आणि नंतर आम्हाला नोटीसा पाठवाव्या असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.
कामोठेत फेरीवाल्यांना मारहाणप्रकरणी कालच पाच मनसैनिकांना जामिन मिळाला असतानाच आज सीबीडी पोलिसांनी मनसेच्या पदाधिकार्यांना व कार्यकर्त्यांना नोटीसा धाडल्याने फेरीवाला व मनसे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.