दिपक देशमुख
नवी मुंबई : जुईनगर स्टेशन परिसरातील सानपाडा, सेक्टर-११ येथील ‘बँक ऑफ बडोदा’वरील दरोडा प्रकरणात सहभाग असलेल्या आदेश वर्मा नामक नवव्या आरोपीला अलाहाबाद येथून अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ३०० ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत.
सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हाजीद अली या आरोपीने बँकेतून लुटलेल्या दागिन्यांपैकी सुमारे साडे तीन किलो वजनाचे दागिने आपल्या बहिणीकडे दिल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी हाजीद अली याच्या बहिणीचा शोध सुरु केला आहे.
जुईनगर बँक दरोडा प्रकरणात पोलिसांच्या हाती आतापर्यंत ९ आरोपी लागले असल्याने तसेच अजून काही आरोपी फरार असल्याने संघटितरित्या सदर गुन्हा या आरोपींनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदर सर्व गुन्हेगारांवर पोलिसांकडून मोक्काची कारवाई केली जाणार असल्याचे समजते. या दरोड्यासाठी आठ लाखाची गुंतवणूक करण्यात आली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
सानपाडा, सेक्टर-११ येथील बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेवर अंडरग्राऊंड भुयाराच्या माध्यमातून दरोडा टाकून फरार
झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील आतापर्यत
१) श्रावण हेगडे
२) मोईन खान
३) हाजी अली मिर्झा बेग
४) अंजन मांझी उर्फ अंजु यांना गोवंडी बैंगनवाडीतून अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इर्टीगा व काही दागिनेही हस्तगत केली आहे.
५) संजय वाघ मालेगावचा सोनार, यास दरोड्यातील सोने विकले होते.
६) मोईद्दीन शेख यास कोलकाता हावडा येथून अटक केली
७) किशन मिश्रा यास उत्तर प्रदेशातून अटक केली आहे
८) शुभम वर्मा यास अलाहाबाद येथून अटक केली आहे.
९) आदेश वर्मा यासही नवी मुंबई पोलिसांनी अलाहाबाद येथून अटक केली आहे.
सदर गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेला हाजिद अली याच्या नावावर घरफोडीचे जवळपास १०० हुन अधिक गुन्हे दाखल असून त्यानेच गत २४ नोव्हेंबर रोजी रात्री महापालिका रुग्णालयात स्वतःचे डोके आपटून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. अट्टल गुन्हेगार असलेल्या हाजीद अली याच्याकडे बँक ऑफ बडोदा लुटीतील बहुतांश सोने असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार गेनाप्रसाद नसून बैंगनवाडी येथे अटक केलेला हाजी अली हाच मुख्य आरोपी असल्याचे आता उघड होवू लागले आहे. त्याने या दरोड्यासाठी तब्बल आठ लाखाची गुंतवणूक केल्याचे तपासात उघड झाले असून दरोड्यातील अधिकाधिक सोने त्याने स्वत:कडेच ठेवले होते. त्यापैकी साडे तीन किलो सोने त्याने बहीणीकडे दिल्यामुळे पोलीस या बहीणीचा शोध घेत आहेत.
आता काही दिवसातच या सर्व गुन्ह्याची उकल होवून सर्वच्या सर्व आरोपींना गजाआड केले जाणार असल्याचा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आजवर तपासाचा मुख्य सूत्रधार म्हणून गाळा भाडड्याने घेणार्या गेनाप्रसाद याकडे पाहिले जात होते. पण आता वेगळीच माहिती समोर येत आहे. गेनाप्रसादचा मृत्यू आजारपणामुळे झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी पोलीस मात्र त्यावर विश्वास ठेवत नसून गेनाप्रसादचा शोध घेत आहेत.