नवी मुंबई : सानपाडा, सेक्टर ११ मधील बॅक ऑफ बरोडाच्या शाखेमध्ये दरोडा पडल्याच्या घटनेला आता १८ दिवस उलटले तरी बॅकेकडून संबंधित लॉकरधारकांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भुयार खोदून टाकण्यात आलेल्या दरोड्यात ३० लॉकर तोडण्यात आले असले तरी बॅक मात्र आपल्या जबाबदारीपासून अंग झटकत आहे. ज्यांचे लॉकर तुटले आहेत, त्यांना बॅकेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यात आलेले नाही. दरोडा पडल्यानंतर बॅकेच्या आवारात व अर्ंतगत भागात सीसीटीव्ही नसणे, सुरक्षा रक्षक नसणे, धोक्याचा अलार्म न वाजणे आदी त्रुटी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे बॅकेच्या भूमिकेविरोधात लॉकर तुटलेले ग्राहक संघटीत झाले असून त्यांनी ग्राहक न्यायालयात व उच्च न्यायालयात जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आज दुपारी ३ वाजता लॉकर तुटलेले २० ग्राहक आले होते. सोबत ग्राहकांचे वकील ऍड. स्वप्निल कदम होते. बॅक मंनेजरशी चर्चा करून लवकरच बॅकेच्या या शाखेला व मुख्यालयाला नोटीस पाठवून ग्राहक न्यायालयात व उच्च न्यायालयात खेचणार असल्याचे ऍड . कदम यांनी सांगितले. दागिन्याची व पैशाची चोरी होवूनही बॅक मुजोरपणा दाखवित असल्याचा संताप यावेळी ग्राहकांनी व्यक्त केला.