नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नवी मुंबई परिसरात इंटरनेटद्वारे ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणारी टोळी उध्व्स्त
करण्याची कामगिरी केली आहे. सदर कारवाईत पोलिसांनी ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणार्या चौघा जणांना अटक करुन त्यांच्याजवळ असलेले सात मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसेच वेश्याव्यवसायासाठी आणल्या
गेलेल्या तीन महिलांची सुटका देखील केली आहे. सदर ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणार्या टोळीला मुली पुरवणारा दलाल फरार झाला आहे.
सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्यामध्ये दुर्गेशकुमार अशोक चौधरी (२१), अनिलकुमार बाबुलाल शहा (२३), रितेश अनुज पासवान (२१) आणि अनिकेतकुमार विनयकुमार पांडे (२०) या चौघांचा समावेश असून या चौकडीने गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत ऑनलाईन सेक्स रॅकेट सुरु केले होते. त्यासाठी या टोळीने नवी मुंबई एस्कॉर्ट सर्व्हिसेस या वेबसाईटवर वेश्यागमनासाठी मुली पुरविल्या जातील, अशा प्रकारची जाहिरातबाजी करुन एस्कॉर्ट सर्व्हिसेससाठी मोबाईल नंबर देखील दिला होता. सदर मोबाईलवर फोनवर एखाद्या ग्राहकाने एस्कॉर्ट सर्व्हिसेससाठी संपर्क साधल्यास त्याला पसंतीनुसार वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविण्याचे काम सदर टोळी करत होती.
सदर सेक्स रॅकेटची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण आणि त्यांच्या पथकाने पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह- पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपआुक्त तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्स रॅकेट चालविणार्या एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या वेबसाईटवरील मोबाईलवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून २८ नोव्हेंबर रोजी दुपारी संपर्क साधला. तसेच वेश्यागमनासाठी मुलीची मागणी केली. त्यानंतर फोनवरील व्यक्तीने बनावट ग्राहकास नेरुळ, सेक्टर-५ मधील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजजवळ बोलावून घेतले. त्यानंतर दुर्गेशकुमार चौधरी तीन महिलांना घेऊन बनावट ग्राहकाजवळ गेला. यावेळी बनावट ग्राहकाने
त्यातील एका महिलेला पसंत केल्यानंतर दुर्गेशकुमार याने त्या महिलेचा वेश्यागमानाचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची रक्कम बनावट ग्राहकाकडून घेतली.
सदर सगळा प्रकार सुरु असतानाच त्या भागात सापळा लावून असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा मारुन सगळ्यांची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनीयदुर्गेशकुमारसह त्याच्या इतर तीन साथिदारांना पीटा कायद्यांतर्गत अटक केली. तसेच त्यांनी वेश्यागमनासाठी आणलेल्या तीन महिलांची सुटका केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले
चौघेजण मोबाईलवरुन इंटरनेटद्वारे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी या चौघांजवळ असलेले सात मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मोबाईल फोनची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असून मोबाईलच्या तपासणीत त्यांनी कुणा-कुणाला वेश्यागमनासाठी मुली पुरविल्या आहेत? कशा पद्धतीने त्यांनी आर्थिक व्यवहार केले आहेत,याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.