सुजित शिंदे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी मार्केटमधील २८८ गाळ्यांच्या अतिरिक्त भाजी मार्केटमध्ये प्रवेशद्वारावरच सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयात महिला व पुरूषांकरिता स्वतंत्र विभाग असतानाही महिलांच्या शौचालयात पुरूष खुलेआमपणे लघुशंका करताना तसेच स्नान करताना पहावयास मिळतात. त्यामुळे महिलांची कोंडी होत असून त्यांना लघुशंकेसाठी मार्केटमधील अडगळीच्या जागेचा आधार घ्यावा लागत आहे.
यासंदर्भात भाजी मार्केटचे उपसचिव जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी स्वच्छता अधिकारी सतीश कटकधोंड यांना भेटा सांगून आपली जबाबदारी झटकली. बाजार समिती मुख्यालयात गेलो असता तळमजल्यावरील कार्यालयात स्वच्छता अधिकारी कटकधोंड आणि तिसर्या मजल्यावरील बाजार समिती सचिव पहिनकर तसेच बाजार समितीवरील प्रशासक सतीश सोनीही कार्यालयात उपलब्ध नव्हते. मार्केटमध्ये प्रवेशद्वारावर असणार्या सुरक्षा रक्षक तसेच मार्केटमधील व्यापारी व अन्य लोकांना सांगूनही महिलांना त्या ठिकाणी असणार्या पुरूषांमुळे शौचालयाचा वापर करता येत नसल्याचा संताप यावेळी व्यक्त केला.
यावेळी मार्केटमध्ये चौकशी केला असता, बाजार समिती आवारात सर्वत्र हेच चित्र असल्याची माहिती इतरांनी दिली. अतिरिक्त भाजी मार्केटमधील सार्वजनिक शौचालयात बाजार समितीकडून पाणीही देण्यात येत नसल्याने संबंधित ठेकेदाराला टॅकरने पाणी विकत आणावी लागत असल्याची तसेच हे सार्वजनिक शौचालय बकाल झाल्याने ठेकेदाराने स्वखर्चाने शौचालयाची रंगरंगोटी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मार्केटमध्ये महिलांच्या शौचालयात एकादी दुर्घटना घडल्याशिवाय बाजार समिती प्रशासनाचे डोळे उघडणार नसल्याची संतापजनक प्रतिक्रिया यावेळी मार्केटमधील महिलांकडून व्यक्त करण्यात आली.