नवी मुंबई : पामबीच मार्गालगत असलेल्या सारसोळेच्या जेटीवरील हायमस्ट अनेकदा बंदच असल्याने खाडीसाठी मासेमारीसाठी सारसोळेच्या ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी अंधारातच ये-जा करावी लागते. त्यामुळे हा हायमस्ट तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी सारसोळेचे ग्रामस्थ आणि नवी मुंबई महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पामबीच मार्गावर नेरूळ परिसरात सारसोळे जेटी आहे. या जेटीवरूनच सारसोळेचे ग्रामस्थ मासेमारीसाठी खाडीमध्ये ये-जा करत असतात. महापालिका प्रशासनाकडून २०१५ साली नारळीपौर्णिमेच्या दिनी हायमस्टचे लोकार्पण करण्यात आले. पण हा हायमस्ट कमी काळ चालू आणि अधिक काळ बंदच असतो. गेल्या काही दिवसापासून हा हायमस्ट बंदच पडलेला आहे. यामुळे सारसोळेच्या ग्रामस्थांना रात्रीच्या अंधारात खाडीमध्ये ये-जा करावी लागते. खाडीअर्ंतगत भागात जेटी परिसरात नाग,साप, घोणस, मण्यार आदींचे दर्शन ग्रामस्थांना नेहमीच होत असते. रात्रीच्या अंधारात जेटीवर मासेमारीसाठी वावरताना कोणाचा यावर चुकून पाय पडल्यास सर्पदंशाचा प्रकार होवून मृत्यू येण्याची भीती मनोज मेहेर यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
सागरी मार्गाचे महत्व लक्षात अंधाराचा गैरफायदा घेवून समाजविघातक अपप्रवृत्ती गैरप्रकार करण्याचीही भीती आहे. हायमस्ट बंद असल्याने रात्रीच्या वेळी जेटी परिसरात ग्रामस्थांव्यतिरिक्त अन्य कोणाचा वावर आहे का अथवा नाही याबाबत रात्रीच्या अंधारामुळे कोणतीही कल्पना येत नाही. याशिवाय याच सारसोळेच्या जेटीवर पाच वर्षापूर्वी रात्रीच्या अंधाराचा फायदा उचलत समाजकंठकांनी जेटीवर असणारी ग्रामस्थांची मासे पकडण्याची तब्बल १४ जाळी जाळून टाकली होती. यामुळे सारसोळेच्या गोरगरीब ग्रामस्थांचे पाच लाखाचे नुकसानही झाले होते. जाळी जाळणारे अद्यापि पोलिसांना सापडले नसल्याने ग्रामस्थ रात्रीच्या अंधारामध्ये भीतीच्या दडपणामध्ये आजही वावरत आहेत. त्यामध्ये हायमस्ट बंद पडल्याने सतत जेटीवर अंधारच असतो. आपण समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून सारसोळेच्या जेटीवर बंद पडलेला हायमस्ट सुरू करण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत, तसेच हा हायमस्ट बंद पडणार नाही याबाबतही पालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी मनोज मेहेर यांनी आपल्या निवेदनात केली आहे.