स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
पनवेल : राज्यात विचारांची हत्या करण्याचे सत्र अधूनमधून सुरू असताना, पनवेल महापालिकेचे धाडसी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना आलेल्या निनावी पत्रामुळे त्यांच्या जीविताचा धोका ओळखून पनवेल संघर्ष समितीने पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून शिंदे यांना शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त पुरविण्याची महत्वपूर्ण मागणी केली होती. त्या पत्राची दखल घेत बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. याबद्दल संघर्ष समितीने पोलिस आयुक्तांना धन्यवादही दिले आहेत.
महापालिकेच्या स्थापनेपासून प्रशासक तथा आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून डॉ. सुधाकर शिंदे यांनी कामाचा धडाका लावला आहे. त्यांनी बेकायदेशिर कामाला ब्रेक लावल्याने राजकीय तंबूत घबराट पसरली होती. राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली वाढलेले काही झोपडपट्टी दादा, विटभट्टीधारक, अतिक्रमणधारक, परपांतिय हातगाडी चालक आदींचा उच्छांद डॉ. शिंदे यांनी मोडीत काढल्यापासून ते बड्या राजकीय नेत्यांच्या रडारवर होते. त्यातूनच त्यांची बदली करण्यात काही नेत्यांना यशही आले होते. मात्र, पनवेल संघर्ष समितीने ‘पनवेल बचाव’, चा नारा देत आयुक्तांना पाठबळ देत पनवेल ते मंत्रालयपर्यत लढा उभारला आणि आयुक्तांची फेरनियुक्ती करण्यास शासनाला प्रवृत्त केले.
पुन्हा सेवेत रूजू झालेल्या आयुक्तांनी तोच धडाका लावत राजकीय हस्तक्षेप झुगारून लावला. सभागृहात प्रशासनाविरोधी सूर लावणार्या लोकप्रतिनिधींना ‘धीरे का झटका जोरसे’ दिला. प्रभाग समित्यांची सभागृहाने केलेली मोडतोड आयुक्तांनी फेटाळून लावली, तिथे सत्ताधार्यांचा मोठा पराभव झाला आहे. ती सल त्यांना बोचत आहे. गेल्या पाच महिन्यात प्रभाग समित्यांची निर्मित्ती न झाल्याने सत्ताधार्यांचा तिळपापड झाला आहे. सहन होत नाही, नाही सांगता येत नाही, अशा अवस्थेत असतानाच सत्ताधारी विरूद्ध प्रशासन असा नवा अध्याय महापालिकेत सुरू झाला. त्यातून त्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची उघड धमकी देण्यात आली. ते प्रकरण सुरू असतानाच, ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची तंबी देत आयुक्तांचा लगाम खेचण्याचाही प्रयत्न झाला. परंतु, त्यालाही आयुक्तांनी बेदखल केल्याने भलेभले घायाळ झाले आहेत.
अशा स्थितीत पनवेल महापालिका आणि आयुक्त असतानाच, त्यांना उपायुक्त संध्या बावनकुळे, जमिर लेंगरेकर यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र पाठवून अज्ञातांनी एकच खळबळ माजवून दिली होती. त्या धमकी पत्राचे गांभीर्य लक्षात घेवून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी तात्काळ पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, उपायुक्त राजेंद्र माने यांना पत्र पाठवून डॉ. शिंदे यांना सशस्त्र पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती. त्या पत्राची दखल घेत शस्त्र पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कॉ. कलुबर्गी, पत्रकार गौरी लंकेश आदी विचारवंतांची हत्या झाली आहे. त्यामुळे डॉ. शिंदे त्यांच्याच मार्गावरील पाईक असल्याचे पत्रात संघर्ष समितीने म्हटले होते. त्यांच्या जीविताला असलेला धोकाही पत्रातून अधोरेखित केला होता.