हॉटेलवाल्यांकडून स्वस्त दरात मुबलक भाज्यांची खरेदी
नवी मुंबई : गेली दोन दिवस पडणार्या अवकाळी पाऊसाचा फटाका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या उलाढालीवर पडला आहे. अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी चिखल झाल्याने, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी फेरीवाल्यांना व्यवसाय करणे शक्य झाले नाही. परिणामी बुधवारी मार्केटमध्ये खरेदीदार कमी संख्येने आले. पहाटे ४ वाजता सुरू झालेले मार्केट दुपारचे दोन वाजून गेले तरी गाळ्यागाळ्यावर व्यापारी भाज्या विकण्यासाठी खरेदीदारांची प्रतिक्षा करत होता. याचा फायदा उचलत हॉटेल व्यावसायिकांनी मिळेल त्या पडेल दरात भाजी खरेदीचा सपाटा लावल्याने भाज्या आज कवडीमोल भावाने विकल्या गेल्याचे पहावयास मिळाले. शेतकर्यांना मंगळवार, बुधवार व कदाचित अजून पुढचे दोन दिवस भाज्या विक्रीतून हातात फारसे काही न मिळण्याची शक्यता आहे.
बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये बुधवारी ५३९ वाहनांतून विक्रीसाठी भाज्या आल्या तर ४९५ वाहनातून भाज्या विक्रीसाठी मार्केटमधून बाहेर गेल्या. आवक भाज्यांमध्ये २३ हजार ४९२ क्विंटल भाज्या तर ४ हजार २६८ क्विंटल पालेभाज्यांचा समावेश होता. आजच्या विक्री व्यवहारावर नजर टाकली असता भुईमुगाच्या शेंगा ४० रूपये किलो, लिंबू ८ रूपये किलो, सातारचे आले १६ रूपये किलो, बॅगलोरचे आले १८ रूपये किलो, अरबी १८ रूपये किलो, आवळा १८ रूपये किलो, बीट १२ रूपये किलो, भेंडी नंबर १ची २० रूपये किलो, भेंडी नंबर २ ची ७ रूपये किलो, डांगर भोपळा १२ रूपये किलो, दुधी भोपळा १० रूपये किलो, चवळीची शेंग २० रूपये किलो, ढेमसे १८ रूपये किलो, फरसबी २० रूपये किलो, फ्लॉवर १० रूपये किलो, गाजर १४ रूपये तर गवार २५ रूपये किलो, घेवडा २५ रूपये किलो, काकडी नंबर १ची १० रूपये तर नंबर २ ची ५ रूपये किलो, कारली १६ रूपये तर केळी भाजी १८ रूपये, कोबी १० रूपये तर कोहळा २० रूपये किलो, ढोबळी मिरची २० रूपये किलो, पडवळ ८ रूपये किलो, परवर ३० रूपये तर फणस २० रूपये किलो, रताळी १२ रूपये तर शेवगा शेंग ७ रूपये किलो, शिराळी दोडका ३० रूपये तर सुरण २२ रूपये किलो, टॉमटो नंबर १ चे ३० रूपये तर नंबर २ चे१६ रूपये किलो, तोंडली कळी १५ रूपये किलो तर तोंडली जाडी १० रूपये किलो, वाटाणा २० रूपये तर वालवड १६ रूपये किलो, काटेरी वांगी १० रूपये तर गुलाबी वांगी ८ रूपये आणि काळी वांगी ७ रूपये किलो, ज्वाला मिरची १८ रूपये तर लवंगी मिरची २२ रूपये किलोने विकली गेली.
पालेभाज्यांच्या विक्रीमध्ये कढीपत्ता १० रूपये किलो, नाशिकची कांदा पात ७ रूपये जुडी, पुण्याची कांदापात ५ रूपये जुडी, नाशिकची कोथिंबीर ८ रूपये तर पुण्याची कोथिंबीर ४ रूपये जुडी, नाशिकची मेथी १२ रूपये तर पुण्याची मेथी ५ रूपये जुडी, मुळा १० रूपये जुडी, नाशिकची पालक ६ रूपये तर पुण्याची पालक ४ रूपये जुडी, शापू नाशिकची ८ रूपये तर पुण्याची शापू ६ रूपये जुडी, नाशिकचा पुदीना ४ रूपये जुडी या दराने विकला गेला.
पहाटे ४ वाजल्यापासून भाजी विकणार्यांनी व्यापार्यांनी दुपारी १२ नंतर गाळ्यावरील शिल्लक भाज्या हॉटेलवाल्यांना येईल त्या भावाने विकण्यास सुरूवात केली. त्यामुळे आज हॉटेलवाल्यांना मागेल त्या दराने भाज्या उपलब्ध झाल्या.