नवी मुंबई : : एकीकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे तर दुसरीकडे मनसेनेही नवी मुंबईत फेरीवाल्यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. महापालिका स्थापनेला आता २५ वर्षाचा कालावधी लोटला तरी महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईकरिता मार्केटची निर्मिती विभागाविभागात केलेली नाही. त्यामुळे पदपथ व रस्त्यांवर फेरीवाले व्यवसाय करत आहेत. फेरी परवान्याकरिता पालिका प्रशासन उदासिनता दाखवित असून फेरीवाल्यांच्या बायोमेट्रीकला फेरीवाल्यांचा विरोध आहे. व्यवसायावर आलेले संकट आणि पालिकेची उदासिनता यामुळे नवी मुंबईतील फेरीवाल्यांनी ११ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
नवी मुंबई हॉकर्स युनियन, नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समिती, सीबीडी बेलापुर हॉकर्स युनियन, न्यु बॉम्बे हॉकर्स युनियन, श्री गणेश वेल्फेअर संघ, नेरूळ रोजगार व्यापार संघटना, श्रीगणेश फेरीवाला असोसिएशन, विकास नगर फेरीवाला असोसिएशन, नवी मुंबई हॉकर्स ऍण्ड वर्कस युनियन यासह फेरीवाल्यांच्या अन्य संघटनाही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. पालिका प्रशासनाला आयुक्त, महापौर यांना संपाबाबत कळवून दहा दिवसाचा कालावधी लोटला तरी प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने बेमुदत संपावर जाण्याचा इशारा फेरीवाल्यांनी दिला आहे. या संघटनांचे ८ हजाराहून अधिक फेरी विक्रेेते सदस्य असून फेरीवाल्यांनी संप पुकारल्यास नवी मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.