सुजित शिंदे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : रेल्वे प्रवासात लुटमार करण्याच्या उद्देशाने रेल्वेतून ॠतुजा बोडकेला ढकलून देण्याच्या घटनेला आठ दिवसाचा कालावधी लोटला तरीही आरोपी संतोष केकानला जेरबंद करण्यात वाशी रेल्वे पोलिसांना अपयशच आले आहे. रेल्वे प्रवासातील महिलांच्या सुरक्षिततेवरून रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता उलटसूलट प्रतिक्रिया महिला प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गत शनिवारी (दि. २ डिसेंबर) रेल्वे प्रवास करणार्या ॠतुजा बोडकेला लुटमार करण्याच्या उद्देशाने महिलांच्या डब्यात शिरलेल्या संतोष केकान याने चालत्या रेल्वेतून फेकून देण्याची घटना घडली. नेरूळ व जुईनगर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान हा प्रकार घडला. संतोष केकान हा अभियांत्रिकी डिपलोमाधारक असून तो टिटवाळा येथील मारड गावचा राहणारा आहे. मानसरोवर रेल्वे स्टेशनवर त्याच्या मित्राने त्याला इनोव्हा वाहनातून सोडले. पोलिसांनी या इनोव्हाचा माग काढल्यावर संतोष केकानची माहिती पोलिसांना सापडली. मानसरोवर ते सीवूडदरम्यान पुरूषाच्या डब्यात प्रवास करणार्या संतोष केकान सीवूडला महिलांच्या डब्यात चढला. नेरूळ ते जुईनगर दरम्यान लुटीच्या उद्देशाने संतोषने ॠतुजाबरोबर झटापट केली. यात ॠतुजाची बॅग, कानातील रिंगा व मोबाईल संतोषने हिसकावून घेत संतोषने ॠतुजाला रेल्वेतून ढकलून दिले. त्यानंतर संतोष जुईनगर रेल्वे स्टेशनला उतरून निघून गेला. त्यावेळी त्याच्याकडे ॠतुजाची बॅग असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.
ॠतुजाने रूळावरून पायी चालत जुईनगर रेल्वे स्टेशन गाठले व वाशीपर्यत रेल्वेने प्रवास करत आली. ॠतुजा ही एमबीबीएसची विद्यार्थीनी असून बडोद्यावरून नवी मुंबईला येत असताना हा प्रकार घडला. वाशी रेल्वे स्टेशनबाहेर तिच्या वडीलांनी याबाबत वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार करत ॠतुजाला वाशीतील एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ॠतुजाला या घटनेत चांगलीच दुखापत झाली. या दरम्यान रेल्वेमध्ये महिलांच्या डब्ब्यामध्ये रेल्वे पोलीसही बंदोबस्ताला नसल्याने रेल्वे पोलीसांवर हे प्रकरण चांगलेच शेकले गेले.
कोणातरी गर्दुल्याने, भुरट्या चोराने अथवा दारूड्याने हा प्रकार केल्याचा अंदाज बांधत रेल्वे पोलिसांनी सुरूवातीचे चार दिवस कामोठे, तळोजा, मानखुर्द, गोवंडी यादरम्यानच तपास केला. पोलीसांची तीन पथके याबाबत अजूनही शोध घेत आहेत. रेल्वे पोलिसांसोबत रेल्वेचा विशेष गुन्हे विभागही याप्रकरणी शोध घेत आहे. अखेर सीसीटीव्हीत इनोव्हा दिसल्यावर संतोष केकानचा उलगडा काही तासातच झाला.
संतोष केकानला गुरूवारी पकडण्यासाठी टिटवाळा ग्रामीण पोलीस गेले असता मारड या गावी गेले असता घटनेतील आरोपी संतोष केकान याने पोलिसांना धक्का मारून पलायन केले. यामध्ये पोलीस जख्मी झाला असून सरकारी कामात अडथळा आणि पोलीसावर हल्ला असे दोन आणखी गुन्हे संतोषवर टिटवाळा पोलीसांनी दाखल केले आहेत. तपासात संतोषच्या घरी ॠतुजाची बॅग सापडली असून तिचा मोबाईल व कानातील रिंगा अजूनही सापडलेल्या नाहीत.
रेल्वे पोलिस, रेल्वे पोलीसांचा गुन्हे विभाग (मुंबई) आणि टिटवाळा पोलीस संतोष केकानचा कसून शोध घेत आहेत. संतोषच्या नातेवाईकांच्या तसेच मित्रांच्या घराचीही झडती घेण्यात येत आहे. जवळच्या व्यक्तिंचे मोबाईल संभाषणही तपासले जात आहे. या तपासात संतोषच्या घरच्या परिस्थिती हलाखीची असल्याचे आणि संतोषची आई दुसर्याच्या घरी धुण्या-भांड्याचे काम करत असल्याचे उघडकीस आले. संतोषचा बाप माळकरी असून मिळेल ते काम करत आहे. संतोषने हे दारूच्या नशेत कृत्य केले असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. संतोषचा परिवार अशिक्षित असून संतोष या एकट्यानेच अभियांत्रिकी डिपलोमापर्यत शिक्षण घेतले आहे. आठवडा उलटला तरी संतोष अद्यापि न सापडल्याने वाशी रेल्वे पोलिसांची झोप उडाली आहे.
वाशी रेल्वे पोलिसांनी आज शनिवारी आरोपी संतोष केकानच्या मामाला व मेहूण्यालाही चौकशीसाठी वाशीला बोलविले होते. संतोषच्या मामा व मेहूण्याला ताकीद देत संतोष संपकार्र्त असल्यास लवकरात लवकर पोलीसांच्या स्वाधीन करण्याच्या सूचनाही पोलिसांनी केल्या.