** जवानांच्या समस्या सोडविणार
** केंद्राची पुनर्बांधणी करणार
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : आमदार संदीप नाईक यांनी महापौर जयवंत सुतार यांच्या समवेत रविवारी एरोली येथील अग्निशमन केंद्राचा अचानक पाहणीदौरा केला. अग्निशमन जवानांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच पडझड झालेल्या या केंद्राची आधुनिक पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
अगदी सकाळीच आमदार नाईक हे महापौर सुतार यांच्या सोबत ऐरोलीच्या अग्निशमन केंद्रात पोहोचले. त्यांनी तेथील जवान आणि अधिकार्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येथील अग्निशमन वसाहतीची पडझड झाली असून अनेक ठिकाणी गळती आहे. स्लॅब पडत आहेत. पाणी साठते आहे असे दिसून आले. जवानांना पुरविण्यात येणारी सुरक्षा साधणे उदा. सुरक्षाबुट, अग्निरोधक जॅकेट आदींची माहिती घेतली. जवानांना गणवेश आणि बुट मिळत नसल्याचेही निष्पन्न झाले. हे अग्निशमन केंद्र सिडकोकालिन असून त्याची आधुनिक पध्दतीने पुनर्बांधणी करावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी महापौर सुतार यांच्याकडे केली. पुनर्बांधणी करीत असताना या केंद्रालगतच्या रस्त्यावरील भविष्यकालिन वाढती वाहतुककोंडी लक्षात घेवून संकटकाळी अग्निशमन वाहनांना येथून सुरळीत बाहेर पडता येईल काय? याचाही विचार करावा, अशी सुचना केली. अग्निशमन दलाच्या ज्या उपकरणांचा वापर बंद झाला आहे ती भंगारात टाकण्यापेक्षा तीचा फिटनेस तपासून पर्यायी उपयोग करता येईल, काय? याकडे लक्ष देण्याची सुचना केली. अग्निशमन दलातील कालबाहय झालेले पाण्याच्या टॅकरचा फिटनेस तपासून त्याच्यात आवश्यक बदल करुन ते पालिका उद्यानांमधून पाणी टाकण्यासाठी वापर केल्यास उद्यानांसाठी नविन टँकर घेण्याकरीता लागणारा पालिकेचा निधी वाचेल, नागरिकांच्या कररुपाने आलेल्या पैशाची बचतही होईल, असे महापौर सुतार यांनी सांगितले. आमदार नाईक यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासोबत लवकरच बैठक घेवून या केंद्रातील समस्या मार्गी लावू, अशी माहिती महापौर सुतार यांनी दिली. अग्निशमन दलाचे जवान अतिशय लहान खोल्यांमधून राहत असून त्यांना पुनर्विकासातून दर्जेदार घरे देण्याचा प्रयत्न राहिल, असे ते म्हणाले.
एरोली नाटयगृहाच्या जागेची देखील केली पाहणी
ऐरोली येथील प्रस्तावित नाटयगृहाच्या जागेलाही आमदार नाईक आणि महापौर सुतार यांनी भेट दिली. आमदार नाईक यांच्या मागणीनुसारच हे नाटयगृह होत आहे. त्याकरीता पाठपुरावा करुन त्यांनी सिडकोकडून पालिकेला भुखंडही उपलब्ध करुन दिला. मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे त्याचे काम रखडले आहे. नाटयगृहासाठी आमदार नाईक यांनी आपला आमदार विकासनिधी देखील दिला आहे. त्यामधून नाटयगृहाची बैठक व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.
नाटयगृहाच्या जागेत पावसाचे पाणी साठले आहे. ही जागा रस्त्याच्या कडेलाच आहे. या रस्त्यावरही खोदकाम झालेले आहे त्यामुळे येथे अपघाताचा धोका आहे. शिवाय या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे. या विषयी महापौरांना उपाययोजना करण्याची विनंती आमदार नाईक यांनी केली. या नाटयगृहाच्या आड येणार्या तांत्रिक अडचनी दूर करुन ते लवकरात लवकर उभे करावे. सर्व लोकप्रतिनिधी आणि शहरातील नाटयप्रेमी, कलाप्रेमी या सर्वांची तशी इच्छा आहे असे सांगून आमदार नाईक यांनी महापौर सुतार यांना या दृष्टीने कार्यवाही करण्याची विनंती या प्रसंगी केली. ऐरोलीतील नाटयप्रेमींना नाटके पाहण्यास वाशी येथील विष्णूदास भावे नाटयगृह, ठाणे येथील गडकरी रंगायतन किंवा मुलुंड येथील कालिदास नाटयगृहात जावे लागते. त्यामध्ये त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो त्यामुळे एरोली विधानसभा मतदार संघात एखादे नाटयगृह असावे यासाठी आमदार नाईक यांनी या नाटयगृहाच्या निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत.
मात्र दुर्देवाने प्रशासकीय हलगर्जीपणामुळे हे नाटयगृह अद्याप पूर्ण झालेले नाही. नाटकांसोबतच संगीत विषयासाठी तसेच राज्य नाटय स्पर्धांसारख्या स्पर्धांसाठी येथील कलाकारांना तालमीसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी हे नाटयगृह लवकरात लवकर उभे राहिले पाहिजे, असे मत आमदार नाईक यांनी मांडले. या नाटयगृहासाठी आमदार नाईक यांचा अविरत पाठपुरावा सुरु असून माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह मलाही त्यांनी पत्र देवून नाटयगृहाचे काम लवकर सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार लवकरच नाटयगृहाचा ठेकेदार, पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेवून नाटयगृहामधील अडथळे दूर करु. नाटयगृहासाठी निधीची तरतूद बजेटमध्ये करु, अशी ग्वाही महापौर सुतार यांनी याप्रसंगी दिली.