सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : आरटीओने संपात सहभागी होणार्या रिक्षांचे परवाने निलंबित करण्याची आपली ताठर भूमिका कायम ठेवत कारवाईस सुरूवात केल्यामुळे रिक्षाचालकांना संपातून माघार घ्यावी लागली आहे. एकवीस दिवसापूर्वी तळोजा येथील रिक्षाचालक आणि खारघरचे रिक्षाचालक यांच्यात हाणामारी झाली होती. तत्पूर्वी त्यांच्यात हद्दीमध्ये येवून भाडेआकारणी विषयी गेली अनेक दिवस वाद, शाब्दिक शिवीगाळ होतच होती. परंतु हाणामारी झाली व पोलिसांनी ७ रिक्षाचालकांना अटक केली. रिक्षाचालकांना जामिनावर सोडल्याशिवाय रिक्षा सुरू न करण्याचा निर्धार खारघर रिक्षाचालकांनी घेतला आणि खारघर एकता रिक्षा युनियनच्या माध्यमातून रिक्षा संपात सहभागी झाल्या. खारघरमधील अधिकांश रिक्षाचालक या युनियनचे सदस्य असल्यामुळे खारघरच्या रस्त्यावर मागील २० दिवसात रिक्षा धावताना पहावयास मिळाल्या नाही. तळोजा येथील रिक्षा सुरू असल्यामुळे तुरळक प्रमाणात का होईना रिक्षा रस्त्यावर दिसत होत्या. या २० दिवसामध्ये प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाले. वाहतुक पोलिसांनी व आरटीओने या संपामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु रिक्षा चालक माघार घेत नसल्याचे पाहून संपात सहभागी असलेल्या रिक्षांचे परवाने निलंबित करण्याचा निर्णय आरटीओने घेतला व या निर्णयाच्या अंमलबजावणीसही सुरूवात केली. आरटीओच्या निणर्र्यामुळे संपातील रिक्षाचालकांना माघार घ्यावी लागली असल्याची माहिती काही रिक्षा चालकांनी दिली.
खारघर आणि तळोजामधील रिक्षाचालकांमधील वादामध्ये खारघर एकता रिक्षा युनियनचे अध्यक्ष केसरीनाथ पाटील यांची भूमिका महत्वाची ठरली. खारघरमधील रिक्षाचालकांवर तळोजातील रिक्षामुळे अन्याय होत असल्याची ठाम भूमिका केसरीनाथ पाटील यांनी मांडली.रिक्षाचालकांच्या संपामुळे २० दिवस खारघरवासियांचे खूप हाल झाले. पनवेलचे आमदार प्रशांत पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील यांनीही संप मिटविण्यासाठी पुढाकार घेत रिक्षाचालकांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेरिला खारघरमधील चार रिक्षाथांबे तळोजामधील रिक्षाचालकांना व्यवसायासाठी देण्याचे मान्य झाले. २० दिवसामध्ये रिक्षाचालकांने अतोनात आर्थिक नुकसान झाले तरी केसरीनाथ पाटील यांच्यामुळे या वादावर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याचे समाधान खारघरमधील रिक्षाचालकांकडून व्यक्त केले जात आहे.
दुपारी २.३० वाजल्यानंतर खारघरमधील रस्त्यावर रिक्षा धावू लागल्या, यावेळी खारघर रेल्वे स्टेशनसमोरील रिक्षा थांब्यावर बराच वेळ उभे राहून केसरीनाथ पाटील यांनी रिक्षाचालकांना संप कशाप्रकारे मिटला व संप बैठकीत काय घडले याची माहिती देताना आढळून आले.