कांतीलाल प्रतिष्ठानचे रसिकांसाठी सेंट्रल पार्कमध्ये विनामूल्य आयोजन
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : गेली सात दशके आपल्या आवाजाने संगीत क्षेत्राला चार चाँद लावणारे, भावगंधर्व अर्थातच पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम सांगितिक मैफिलचे आयोजन कांतीलाल प्रतिष्ठान रायगडने येत्या शनिवारी, (दि. 16) सायंकाळी 6 वाजता खारघर येथील सेंट्रल पार्कमधील सिडकोच्या खुल्या रंगमंचावर केले आहे. प्रतिष्ठानच्या प्रणालीप्रमाणे हा सुध्दा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असेल. कानसेनांनी सहकुटुंब उपस्थित राहून “मंगेशकरांचे दैवी देणं”, अनुभवावे, असे आवाहन अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.
“आम्ही ऐकवतो, मंगेशकरांचे दैवी स्वर”, ही संकल्पना घेवून कांतीलाल प्रतिष्ठान रायगडने रसिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यातच पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम सांगितिक मैफिलीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या संगीतसूर्याला मानवंदना देण्याची ही संधी आपल्याला आली आहे. पनवेल, नवीन पनवेलमध्ये त्यांचे कार्यक्रम प्रतिष्ठानने केले असले तरी खारघरला प्रथमच त्यांच्या गायनाची मैफिल सजणार आहे. साक्षात गंधर्व गात असल्याची अनुभूती यावी, असे रंग मैफिलीत भरताना शब्दांची फोड, अर्थ, त्यांची दिशा आणि शब्दमाधुर्यातून सुरेख, चपलख निरूपण करताना आभाळही कान लावून त्यांची गायकी आणि निरूपण ऐकत असल्याचा नारदीय साक्षात्कार बघायला मिळणार आहे.
अमृताने पैंजा जिंकावी, अशा अवीट गोडीच्या हजारो गाण्यांना त्यांनी चालींचे छूमछूम वाजणारे पैंजण बांधून ती गाणी अजरामर केलीत, ती प्रत्यक्ष त्यांच्या ओठांवरुन सहज रूळतानाचा अमृतानुभव या मैफिलीतून खारघर आणि आजुबाजूच्या रसिकांना घेता येईल. कधीच चुकवू नये, अशी मैफल आणि भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या काही आठवणीसुध्दा या सांगितिक कार्यक्रमांतून ऐकायला मिळणार असल्याने आपण उपस्थित राहाल, अशी अपेक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी व्यक्त केली आहे.
रुपेरी पडद्यावर अभिनयाची छाप उमटवत बॉलीहूड गाजविणारा महानायक शशी कपूर यांचे कार्यक्रमादरम्यान रंगमंचाला नाव देवून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येईल.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या समवेत कन्या राधा मंगेशकर, ज्येष्ठ गायिका विभावरी आपटे गाजलेली गाणी पेश करणार आहेत. त्यांना संगीतसाथ करण्याकरीता पखवाज वादक डॉ. राजेंद्र दूरकर, तबला विशाल गंडत्रवार, बासरी अलोक ओक व अन्य कलाकारांचा सहभाग असेल. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील, रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.