नागपूर, दि. 12 : योग्य व उत्तम कायदे तयार करण्याचे काम विधीमंडळामार्फत करण्यात येत असून महाराष्ट्र विधीमंडळाने अनेक क्रांतीकारक कायदे तयार केले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या 47 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळाने माहिती अधिकार, सेवा हमी कायदा, जादूटोणा विरोधी कायदा, जात पंचायती विरोधी कायदा असे महत्वाचे कायदे तयार केले आहेत. अस्तित्वात असलेल्या कायद्यात आवश्यकतेनुसार विधीमंडळात चर्चा करुन सुधारणा करण्यात येते. संविधानाने लोकशाही ही उत्तम व्यवस्था दिली आहे. या व्यवस्थेत माणसं बदलतात, व्यवस्था बदलत नाही. नवीन येणारे प्रतिनिधी सु्द्धा या व्यवस्थेप्रमाणे कामकाज करतात. कुठल्याही विचाराचे सरकार आले तरी त्यांना शेवटच्या व्यक्तीचा विचार करावा लागतो. संविधानाने समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. लोकप्रतिनीधीच्या माध्यमातून तो विधानमंडळात मांडला जातो. लोकशाही त्रिस्तरीय पद्धती आहेत. थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी माध्यमे चौथा स्तंभ आहे. अर्थसंकल्प पारीत करणे हे महत्वाचे काम विधानमंडळामार्फत केले जाते. कुठलाही खर्च करताना सरकारला विधीमंडळाची मान्यता घ्यावी लागते. सरकार हे विधीमंडळाला उत्तरदायीत्व आहे. जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अर्धातास चर्चा अशी विविध आयुधे वापरुन प्रश्न सोडविण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. विधीमंडळाचे कामकाज कसे चालते ते प्रत्यक्षात बघता यावे यासाठी संसदीय अभ्यास वर्गाची चांगली प्रक्रिया सुरु केली आहे. लोकशाही कागदावर न राहता प्रत्यक्ष पाहता यावी, यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. आजच्या अभ्यास वर्गाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास वर्गाच्या माध्यमातून अनुभव संपन्न व्हावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिल्या.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, नवीन धोरणे कोणाच्याही मनाचा कोंडमारा होऊ न देता ठरविली जातात. डिसेंट (सुसंस्कृतपणे) विरोध करण्याची संधी ही लोकशाहीची जादू आहे. आपल्या देशात विविध भाषा, जाती धर्म असूनही सर्वांना एकसंघ बांधण्याचे काम लोकशाहीमुळे झाले आहे.
प्रास्ताविक करताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, संसदीय मंडळाचे कामकाज घटनेप्रमाणे चालते. हे कामकाज कसे चालते पाहण्याची संधी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते. विद्यार्थ्यांनी आपण जे शिकतो ते पूर्ण समजून घेऊन शिकले पाहिजे. अर्धवट घेतलेले ज्ञान लक्षात राहात नाही. उज्ज्वल भविष्यासाठी आपण जे शिकतो ते आपल्या लक्षात राहणे अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार ॲड.आशिष शेलार यांनी केले. राज्यातील विविध विद्यापीठातील राज्य शास्त्र आणि लोकप्रशासन पदव्युत्तर अभ्यास करणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.