नागपूर विधानभवनावर धडकला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विराट जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला जी आश्वासने दिली होती त्याचे काय झाले ? असा सवाल करत खोटी आश्वासने देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील शेतक-यांचा अपमान केला आहे अशी टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसह विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या विराट जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाला संबोधित करताना केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाई (कवाडे) , रिपाई (गवई) आणि इतर विरोधी पक्षांनी नागपूर विधानभवनावर विराट जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे,विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिक्षा भूमीवरून निघून लाखोंच्या संख्येने शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी विधानभवनावर धडक दिली. मॉरिस कॉलेज चौकात मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना काँग्रेस नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.
व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री पतंगराव कदम, शेकाप नेते आ. जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.अबु आझमी, रिपाईचे (कवाडे) अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे, रिपाईचे (गवई) अध्यक्ष राजेंद्र गवई यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते खासदार, आमदार, पदाधिकारी आणि लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
—————————————————————————————–
गुलाम नबी आझाद
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच गुलाम नबी आझाद यांनी ज्या शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षात आत्महत्या कराव्या लागल्या त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. केंद्र आणि राज्य सरकारने खोटे बोलून जनतेची फसवणूक केली म्हणून हा जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा आयोजीत केला आहे. काश्मीरनंतर महाराष्ट्राशी माझा जास्त संबंध राहिला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचे दु:ख मी जाणतो. शेतकरी स्वत:साठी नाही तर सर्वांसाठी शेती करतो, धान्य पिकवतो. शेतक-यांनी धान्य पिकवणे बंद केले तर देश उपाशी राहील. शेतक-यांना खोटी आश्वासने देणा-यांना आता माफी नाही. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था उध्वस्त झाली असून लाखो लोकांच्या नोक-या गेल्या आहेत. या सरकारने देशाला संकटात टाकले असून या विशाल मोर्चाचे आयोजन केल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिनंदन करून सरकारविरोधातील हा संघर्ष अधिक तीव्र करा असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.
———————————————————————————————
मोहन प्रकाश
या विशाल मोर्चाला संबोधित करताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा जोरदार समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र आणि सरसंघचालक मोहन भागवतांना आरसा दाखविण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय नागपुरात आला आहे. काँग्रेस सरकारने मनरेगा,माहिती अधिकार, अन्न सुरक्षेचा अधिकार दिला पण आज नकली लोक सत्तेवर बसले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशी शक्तींच्या इशा-यावर देश चालवत असून देवेंद्र फडणवीस यांचा रिमोट कंट्रोल मोदी आणि भागवतांच्या हातात आहे अशी टीका केली.
————————————————————————————————–
खा. अशोक चव्हाण
या मोर्चाला संबोधीत करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले की, जनसामान्यांचा आक्रोश बुलंद करण्यासाठी जनआक्रोश मोर्चा असून खोटं बोल, रेटून बोलं असे सरकारचे काम सुरु आहे. केंद्रात आणि राज्यात खोटारडे सरकार आहे. सरकारने कर्जमाफी जाहीर केली पण शेतक-यांच्या हाती काहीच पडले नाही. राज्यात बारा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही 1300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत. काँग्रेसच्या काळात विकासात अग्रेसर असलेला महाराष्ट्र आता गुन्हेगारीत अग्रेसर आहे. भाजप सरकारने शिक्षणक्षेत्राचा बट्ट्याबोळ केला असून सरकारने नुकताच 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बंद दारूची दुकाने सुरु… आणि चालू शाळा बंद… असा या सरकारचा कारभार आहे. भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. या सरकारच्या कामकाजावर समाजातील कोणताही घटक समाधानी नाही. त्यामुळे आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. मोर्चाला उपस्थित लाखोंचा जनसमुदाय पाहून आज सरकारला झोप येणार नाही असा टोला लावून जनआक्रोशच्या माध्यमातून सुरु झालेला हा संघर्ष भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय थांबणार नाही असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.