नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे शहर, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तीन प्रमुख शहरांचा समावेश होतो. या शहरामधील वाढती प्रवासी संख्या पाहता या शहरातील रेल्वे स्थानकात अनेक सुविधा माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी आपल्या खासदरकीच्या कार्यकाळात मिळवून दिल्या. त्याच बरोबर प्रवाशांना अधिक सुविधा प्राप्त होण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही शहरातील रेल्वे स्थानकात नवीन सुविधा निर्माण झाल्या आहेत काही सुविधांचे काम सुरू असून त्या लवकरच उपलब्ध होणार आहेत.
डॉक्टर नाईक यांनी एप्रिल २०१७ रोजी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू , रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा,भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ऐ.के.मित्तल ह्यांना पत्र लिहून ठाणे,नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरच्या जनतेला आपल्या दैनंदिन प्रवासात भेडसावणार्या समस्या अवगत करून दिल्या होत्या.
ठाणे स्थानक जागतिक दर्जाचे स्थानक बनवावे,ठाणे स्थानकात सरकते जिने बसवावे, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षिततेसाठी मेटल डिटेक्टर २४ तास चालू ठेऊन त्याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे, ठाणे स्थानकातील भार कमी करण्यासाठी ठाणे व मुलुंड दरम्यान नवीन स्थानक बांधावे, लांब पल्लांच्या गाड्यांना ठाणे स्थानकात थांबा देणे,जेष्ठ नागरिक व दिव्यांग लोकांना पूर्व व पश्चिम बाजूस स्वतंत्र तिकीट खिडकी उपलब्द करून देणे, ज्यादा तिकीट वेंडिंग मशीन उपलब्ध करणे,मुंबईच्या दिशने असलेला प्रवाशी पुल प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून प्लॅटफॉर्म क्रमांक १ पर्यंत वाढवणे,प्लॅटफॉर्म वर टॉयलेट्स आणि मुतारी वाढवणे आदींचा समावेश होता.
नवी मुंबईच्या स्थानकांसाठी डॉक्टर नाईक यांनी अनेक मागण्या केल्या होत्या. दिघा व बोनकोडे हे दोन नवीन स्टेशन लवकरात लवकर मुंबई रेल्वे विकास मंडळ यांच्यामार्फत बांधून घेणे, सिडकोने नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा मालकी हक्क सोडून तो रेल्वे कडे वर्ग करावा,नवी मुंबईच्या जनतेवर जो अधिभार लावला जातो तो थांबवावा, ईलठणपाडा येथील ब्रिटिश कालीन मोगली धरण नवी मुंबई मनपाकडे हस्तांतरित करणे,नवी मुंबईच्या प्रत्येक स्थानकात ज्यादा तिकीट वेंडिंग मशीन दोन्ही बाजूस वाढवणे, स्थानकात तिकीट खिडक्या वाढवून त्यास मनुष्यबळ पुरवणे,नवी मुंबईतील प्रत्येक स्थानकात डॉक्टर्स आणि रुग्णवाहिकेची सोय करावी, ठाणे पनवेल लोकलच्या फेर्या वाढवाव्या आदींचा समावेश होता.
डॉक्टर नाईक यांनी आपला पाठपुरावा सुरू ठेवून पुन्हा ऑक्टोबर २०१७ मध्ये रेल्वे मंत्री आणि संबंधीत अधिकार्यांना मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्मरण पत्र दिले. या पत्राला प्रतिसाद देत मुंबई रेल्वे विकास मंडळाचे विशेष कार्य अधिकारी आर.के.गोयल ह्यांनी दि.१३/११/२०१७ डॉक्टर नाईक ह्यांना पत्र पाठवून त्यांच्या मागणी प्रमाणे संबंधीत मंडळामार्फत ठाणे आणि नवी मुंबई साठी सोयी उपलब्ध करून देत असल्याची माहिती दिली आहे.
ठाणे स्थानकात मुंबईच्या दिशेने नवीन पादचारी पूल बांधण्यात आला असून आणखी एक मीटरचा नवीन पूल प्रस्तावित आहे. ठाणे स्थानकात ४ नवीन सरकते जिने ३१ मार्च २०१८ पर्यंत प्रस्तावित आहेत. तसेच ३ नवीन लिफ्ट ह्या महिन्या अखेर चालू होतील. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक २ मुंबईच्या दिशेने प्रवाशांसाठी १६ मुतार्या व २ टॉयलेट्स तसेच महिलांसाठी १ मुतारी व १ टॉयलेट तसेच कल्याणच्या दिशेने प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पुरुषांसाठी ११ मुतार्या आणि २ टॉयलेट्स तसेच महिलांसाठी १ टॉयलेट्सची व्यवस्था करण्यात आली असून प्लॅटफॉर्म क्रमांक १० वर पुरुषांसाठी १७ मुतार्या आणि २ टॉयलेट्स तसेच महिलांसाठी २ टॉयलेट्स ची सोय करण्यात आली आहे.प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या पश्चिमेस बाजूस वातानुकूलित टॉयलेट्स पुरुषांसाठी २८ मुतार्या ४ टॉयलेट्स तसेच महिलांसाठी ६ टॉयलेट्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. ४ नवीन पाणी वेंडिंग मशिन ला मंजुरी देण्यात आली आहे तसेच अत्यावश्यक वैद्यकीय रूम तसेच ठाणे स्थानकांच्या वाहनतळ मध्ये एक रुग्णवाहिका सुद्धा उपलबध्द करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ५/६, ९/१० १०A ह्या प्लेटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार आहे. ठाणे आणि ऐरोली दरम्यान एक भुयारी मार्ग सुद्धा प्रस्तावित आहे. नवी मुंबई साठी २ ऑक्टोबर पासून ट्रान्स हार्बर वर १४ नवीन फेर्या त्यात ठाणे-वाशी ४, ठाणे-पनवेल ८ आणि ठाणे-नेरुळ २ वाढविण्यात आल्या आहेत. हार्बर मार्गावर वडाळा रोड पनवेल वर १० वडाळा रोड बेलापूर २ वडाळा रोड-वाशी २ अशा एकूण १४ नवीन फेर्या वाढवण्यात आल्या आहेत. नवी मुंबईच्या स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची उंची सुद्धा वाढवण्यात येणार असून त्यात ऐरोली, रबाळे, घणसोली आणि कोपरखैरणेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १A/१,२A/२ तसेच वाशी,तुर्भे, जुईनगर बेलापूरचा प्लॅटफॉर्म क्रमांक ३/४ नेरुळ आणि मानसरोवर फलाट क्रमांक १ चा समावेश आहे. तुर्भे येथे ४.८८ मीटर लांबीचा पादचारी पूल , सीवूड्स दारावे येथे ३.६६ मीटरचा पादचारी पूल सोबत २ लिफ्टस,बेलापूर स्थानकांच्या बाजूला ३.६६ मीटर रुंदीचा पादचारी पूल नियोजित आहे .तसेच राज्य सरकारची १०८ नंबरची रुग्णवाहिका सेवा सध्या वाशी आणि नेरुळ स्थानकात उपलब्ध आहे. वैद्यकीय आणि रुग्ण वाहिकेची सुविधा अन्य स्थानकातही उपलब्ध करून द्यावी अशी मागणी डॉक्टर नाईक यांनी केली आहे. वाशी येथे वैद्यकीय हॉस्पिटलचे काम सुरू असून तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले आहे.
—————————-
खासदरकीच्या कार्यकाळात ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मधील रेल्वे स्थानकात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या याचे समाधान आहे माझ्या कार्यकाळात केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा सुरू होता त्यापैकी अनेक मागण्या आता पूर्ण होत आहेत.
– डॉक्टर संजीव नाईक, माजी खासदार