नागपूर : वाशी, सेक्टर२६ कोपरी गांव येथील २९१ घरांना नवी मुंबई महापालिकेमार्फत देण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्यात येऊन प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना न्याय मिळण्याबाबत ‘बेलापूर’च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात माहितीच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत मागणी केली.
सदर मागणीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कोपरी येथील कारवाईस स्थगिती देण्याबाबत आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी निवेदन दिले आहे.
दरम्यान, आमदार सौ. म्हात्रे यांच्या सदर मागणीमुळे कोपरी गांव येथील २९१ घरे होणार सुरक्षित होणार असून त्याने येथील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने राज्यातील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची बांधकामे नियमित करण्यासंदर्भात ठराव संमत केला असून राज्यपाल महोदयांनी त्यास मंजुरी दिली आहे. परंतु, असे असतानाही नवी मुंबईतील गांव-गांवठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या सन २००० पूर्वीच्या घरांना नवी मुंबई महापालिकेमार्फत नोटिसा बजावण्यात येत आहेत. तसे गांव- गांवठाणात जाहीर नोटिसचे बोर्डही लावण्यात आले आहेत.
कोपरी गावांतील सुमारे २९१ घरांना नवी मुंबई महापालिकेने नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त तसेच स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन भितीचे वातावरण पसरले असल्याची बाब आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी माहितीच्या मुद्याद्वारे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहात शासनाच्या निदर्शनास आणून दिली. राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची बांधकामे नियमित करण्याबाबतचा ठराव समंत केला असताना महापालिकेने कोपरी गांव येथे सर्वेक्षण करून डिसेंबर २०१५ पूर्वीच्या बांधकामांना नोटिसा देऊ नयेत. तसेच दिलेल्या नोटिसा त्वरित मागे घेण्यात याव्यात. अशी मागणीही आमदार सौ. म्हात्रे यांनी विधानसभेत केली.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सदर मागणीचे निवेदन दिले असून महापालिकेमार्फत होत असलेल्या सदर कारवाईला स्थगिती देण्यात यावी. या केलेल्या मागणीच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी देखील डिसेंबर २०१५ पूर्वीच्या बांधकामांवर कारवाई न करण्याचे सूचित केले, अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.