दिपक देशमुख
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेकडील नागरी समस्या महापालिका प्रशासनाने तात्काळ सोडवाव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भगत यांनी महापौर जयवंत सुतार आणि शहर अभियंता मोहन डगांवकर यांची भेट घेवून त्यांना लेखी निवेेदनातून साकडे घातले आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांकडेही लेखी निवेदनातून नागरी समस्यांचा उहापोह केला आहे.
सर्वात श्रीमंत महापालिका मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा दुसरा क्रमांक लागतो.करदात्या नवी मुंबईकरांना नागरी सुविधा देणे हे नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. मात्र नेरुळ सेक्टर-१६,१६ए,१८,१८ए,२०,२४ व सेक्टर २८ मधील रस्ते,गटार,पदपथ,समाजमंदिर,आरोग्यकेंद्र,स्ट्रीट लाईट,डेब्रिज,कचरा,जेष्ठ नागरिक विरुंगुळा केंद्र,मलनिःस्सारण वाहिनी, बाग बगीचे, मैदान,वाहनतळ, सूचना फलक,बस थांबे ,सीसीटीव्ही यंत्रणा ,पोलीस बिट,अभ्यासिका व इतर नागरी सुविधांची कामे अपूर्ण आहेत व काही नागरी सुविधांच्या कामांची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे
फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्डकप २०१७ स्पर्धा सामन्याकरिता नवी मुंबई महानगर पालिका दोन ते तीन महिन्यात तत्परतेने करोडो रुपये खर्च करते पण करदात्या नेरूळच्या जनतेला नागरी सुविधा देण्यासाठी एवढे वर्ष का घेत आहे ? नवी मुंबई महानगर पालिका करदात्यांकडून वसूल होणार्या कोट्यावधी रूपयांपैकी किती टक्केजनतेच्या नागरी सोयींवर खर्च करते व त्यातील किती टक्के कामे होतात ? असे अनेक प्रश्न नागरिकांना सतावत असून नागरिकांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका बद्दल असंतोष वाढत आहे.
योग्य सोयी सुविधा सामान्य जनतेला मिळत नाही म्हणून ही बाब नवी मुंबई महानगरपालिकेच्या निर्दशनास आणून देत नेरुळ सेक्टर-१६, १६ए, १८, १८ए, २०, २४ व २८ मधील अपूर्ण व दयनीय अवस्था झालेल्या नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी समाजसेवक रविंद्र भगत यांनी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन., महापौर जयवंत सुतार आणि शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याकडे केली.