दिपक देशमुख
नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ ला सामोरे जाताना मागील वर्षी महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम व देशात आठव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून असलेले मानांकन उंचावण्यासाठी नवी मुंबईचे सर्व नागरिक सज्ज असून यावर्षी देशात सर्वप्रथम येण्याचा संकल्प आपण केला आहे. याकरिता ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवून आपण प्रत्येक नागरिकाचा स्वच्छता कार्यात सहभाग असावा यासाठी प्रयत्नशील आहोत. यामध्ये सर्व ठिकाणी सर्व वयोगटातील नागरिकांचा चांगला सहयोग मिळत असून स्वच्छ सोसायटी, स्वच्छ शाळा, स्वच्छ हॉटेल अशा वेगवेगळ्या आठ गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली असून त्यामधील विजेत्यांना पुढील आठवड्यात विशेष समारंभात गौरविण्यात येईल असे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी स्वच्छता स्पर्धेचा निकाल पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला.
यावेळी त्यांच्या समवेत उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के व समिती सदस्य श्रीम. सरोज पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण व श्री. रमेश चव्हाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषाऱ पवार आदी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी स्वच्छ सर्वेक्षण – 2018 च्या गुणांकन पध्दतीची व नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या स्वच्छतेबाबतच्या कामांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2017 मध्ये 431 शहरे सहभागी झाली होती व यावर्षी 4041 शहरे सहभागी होत असून स्पर्धेच्या गुणांकनाचे निकष देखील बदलले आहेत. गुणांकनामध्ये 30 टक्के गुणांकन प्रत्यक्ष स्थळ पाहणीस, 35 टक्के गुणांकन पूरक कागदपत्रांस आणि 35 टक्के गुणांकन नागरिक प्रतिसादास आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ बाबतची पूर्वतयारी मागील तीन महिन्यांपासून सुरू असून यामध्ये लोकप्रतिनिधींचा व नागरिकांचा चांगला सहभाग लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. कच-याचे निर्माण होतो त्याच ठिकाणी ओला व सुका असे वर्गीकरण राज्यात सर्वाधिक 80 टक्क्याहून अधिक होत असून 100 किलोपेक्षा जास्त कचरा दररोज निर्माण करणा-या मोठ्या सोसायट्या, संस्था, हॉटेल्स यामध्येही ओला कचरा कम्पोस्टिंग करणे बाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सर्वेक्षणामध्ये लोकांच्या सहभाग व प्रतिसादाला 30 टक्के गुण असून यामध्ये प्रत्येक नागरिकाला आपले नवी मुंबई शहर स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी आहे याची माहिती असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. याकरिता माहितापत्रे, शुभेच्छापत्रे, होर्डींग, बॅनर, व्हॉटस् ॲप फेसबुक ट्विटर इन्स्टाग्राम असा सोशल मिडीया, ध्वनी-चित्र फिती, चलतचित्र वाहने, पथनाट्ये अशा विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या स्मार्टफोनवर Swachhta-MoHUA App हे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे, त्यावर फोटोसह आपली तक्रार नोंदवावी, ज्याची दखल केंद्र सरकारमार्फत घेतली जाते, शिवाय महानगरपालिकेमार्फत त्या तक्रारीचे 24 तासात निवारण करून त्याचाही फोटो त्या ॲपवर टाकला जातो, तक्रारीचे निवारण झाल्यावर नागरिकांनी त्यावर आपला अभिप्राय (feedback) आणि मत (vote up) नोंदवावे असे आयुक्तांनी आवाहन केले. याशिवाय केंद्र सरकारमार्फत कोणत्याही नागरिकास दूरध्वनीवरून शहरातील स्वच्छतेविषयी अभिप्राय विचारणा करण्यात येईल, त्यावेळी शहराच्या स्वच्छतेविषयी आपले अभिप्राय देऊन नागरिकांनी नवी मुंबई शहर देशात नंबर वन बनविण्यासाठी योगदान द्यावे असेही आवाहन आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.
स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के यांनी याप्रसंगी बोलताना महाराष्ट्रात स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबई नेहमीच आघाडीवर राहिली असून त्यामध्ये समाधानी न राहता त्यामध्ये अधिकाधिक सुधारणा करण्याकडे आपण लक्ष देत आहोत असे सांगितले. याकरिता स्वच्छता समितीच्या सभापती म्हणून नवी मुंबईतील विविध भागांना भेटी देताना येणारा प्रत्यक्ष अनुभव सुखावणारा असून आजच रामनगर, दिघा सारख्या झोपडपट्टी भागात तेथील महिला घंटागाडी आल्यानंतर स्वत:हून पुढे येऊन ज्यावेळी ओला व सुका कचरा घरातूनच वेगवेगळ्या डब्यांमध्ये घेऊन येतात व वेगवेगळ्या कचराकुंड्यांमध्ये टाकतात, हे ज्यावेळी बघायला मिळते त्यावेळी लोकांच्या या विषयीच्या जागरूकतेचे व ते स्वयंप्ररणेने करीत असलेल्या गोष्टीचे कौतुक वाटते अशा शब्दात आपले अनुभव कथन केले.
नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी व त्यामध्ये निकोप स्पर्धा होऊन जाणीवजागृती व्हावी याकरिता स्वच्छ गृहनिर्माण संस्था / सोसायटी / मोहल्ला, स्वच्छ शाळा / कॉलेज – खाजगी व महानगरपालिका, स्वच्छ मार्केट, स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ उद्यान, स्वच्छ सार्वजनिक / सामुदायिक शौचालय, स्वच्छ प्रभाग अशा आठ गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद लाभला असून त्यांच्या विजेत्यांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. पुढील आठवड्यात एका विशेष समारंभात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल असे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी जाहीर करीत स्पर्धेचा निकाल घोषित केला. (सोबत संपूर्ण निकाल जोडला आहे.)
स्वच्छता स्पर्धेतील सहभाग हे निमित्त असून या माध्यमातून शहरात स्वच्छतेची संस्कृती रूजावी आणि यामधून स्वच्छ व आरोग्यपूर्ण नवी मुंबई शहर ही नवी मुंबईची ओळख दृढ व्हावी असा प्रयत्न असून यामध्ये प्रत्येक लहानथोर नागरिकाचा सक्रीय सहभाग असेल असा विश्वास महापौर श्री.जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सर्व पदाधिका-यांसमवेत व्यक्त केला.