दिपक देशमुख
नवी मुंबई: लॉकर कसा असावा याविषयी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमावली जारी केली आहे. त्या नियमानुसार बोटावर मोजण्या इतक्याच
बँकांनी लॉकर तयार केले आहेत. मात्र, ९० टक्के बँकांनी आरबीआयच्या सदर सुचनांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येत्या काळात बँकांनी लॉकर सुरक्षेविषयीचे रिझर्व्ह बँकेचे नियम पाळावेत, असे आदेश ‘नवी मुंबई’चे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बँक व्यवस्थापकांसोबत आयोजित केलेल्या कार्यशाळेत दिले.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार लॉकरची भिंत, जमीन आणि लॉकरची जाडी याबाबत मार्गदर्शक तत्वे बँकांनी अंमलात आणावीत, असे आयुक्त नगराळे म्हणाले. असा मोठा गुन्हा, ज्यात ओरीपींनी अत्यंत नियोजनबध्द कट रचून गुन्हा करण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रयत्नात होते,
तो गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान अत्यंत कमी कालावधीत नवी मुंबई पोलिसांनी पेलले. अशा प्रकारचे गुन्हे घडण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले. सुरक्षाविषयक मार्गदर्शक सुचनांची पुर्तता न केल्यामुळे सदरचा मोठा गुन्हा
घडल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्या बाबींमुळे चुकीच्या गोष्टी घडू शकतात या बाबींवर चिंतन केले तरीदेखील अशा प्रकरणांना प्रतिबंध होवू शकतो, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केले.
जुईनगर येथील बँक ऑफ बडोदातील लॉकरफोडीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, पनवेल, उरण क्षेत्रातील सर्व बँकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लॉकर सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात, असे आदेश पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.
या संदर्भात आयोजित बैठकीस शहरातील ८७४ बँकांच्या व्यवस्थापक उपस्थित होते. आतापर्यंत बँकेत झालेल्या चोर्या आणि लॉकरफोडी यांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. गत नोव्हेंबर महिन्यात जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतील लॉकर्स भुयार खोदून फोडण्यात आली होती. या प्रकरणात सव्वातीन कोटींचा ऐवज चोरीला गेला असून पोलिसांनी त्यातील ५० टक्के ऐवज जप्त करीत ११ जणांना अटक केली आहे.
सदर चर्चासत्रात परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी माहितीपूर्ण पॉवरपॉईंट प्रेझेनंटेशनद्वारे बँक ऑफ बडोदा लॉकरफोडीची घटना कशी घडली याबाबत माहिती देवून बँकांना सुरक्षा संदर्भात रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
बँक ऑफ बडोदावरील दरोड्यातील आरोपींकडून सदर प्रकाराची सर्व माहिती घेण्यास पोलिसांना यश आले आहे. यातील चार आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसले तरीही मुख्य सुत्रधाराला अटक झाली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या बँकफोडीचे सादरीकरण तयार करण्यात आले असून देशात यापूर्वी झालेल्या बँक फोडीच्या घटनांची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली.
दरम्यान, कार्यक्रमामध्ये पोलिसांनी सुरक्षा सुचनांची ऍडव्हायजरी दिली आहे. त्याची पूर्णपणे अंमलबजावणणी करावी, असे आवाहन पोलीस उपआयुक्त डॉ. पाठारे यांनी केले.