कांतीलाल प्रतिष्ठानच्या सांगितिक मैफिलीत भ्रमणध्वनीद्वारे साधला रसिकांशी संवाद
दिपक देशमुख
नवी मुंबई : खारघर शहर खूप चांगले आहे. आल्हादायक वातावरण आहे. तेथील माणसंही चांगलीच असतील, असा आशावाद भारतरत्न, गानसरस्वती लता मंगेशकर यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई : खारघर शहर खूप चांगले आहे. आल्हादायक वातावरण आहे. तेथील माणसंही चांगलीच असतील, असा आशावाद भारतरत्न, गानसरस्वती लता मंगेशकर यांनी व्यक्त केला.
सिडकोच्या सेंट्रल पार्कमधील ऍम्पी थिअटरमध्ये कांतीलाल प्रतिष्ठान रायगडने पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम सांगितिक मैफिलीचे शानदार आयोजन केले होते. रसिक, कानसेनांनी खुले रंगमंच खचाखच भरले होते. संगीताची जाण असलेले रसिक आणि त्यांनी फर्माईश केलेली गाणी पेश करून पं. हृदयनाथ आणि कन्या राधा मंगेशकर यांनी रसिकांचे हृदय जिंकले. टाळ्या, शिट्या आणि काहींनी फेर धरल्याने खारघर मंत्रमुग्ध झाले होते.
बाळ, हृदयनाथ खूप चांगले गातो. राधा त्याला साथ देते. रसिक मायबाप तृप्तीचे ढेकर देईपर्यंत ते दोघे गातील, असा विश्वास लता दीदींनी संवादातून पेरला. कांतीलाल कडू यांचे आयोजन आणि त्यांचे सांस्कृतिक चळवळीतील योगदान वाखाण्याजोगी असल्याचे सांगत कांतीलाल कडू यांचे दीदींनी तोंडभरून कौतुक केले, तेव्हा उपस्थितांमधून टाळ्यांच्या फटक्यांनी आसमंतात उजळून निघाले होते.
मुंबईतील वाहतूक कोंडीवर प्रारंभी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, राधा पुण्यातून इथे पोहचली पण मी मुंबईतून इथे त्यावेळात पोहचू शकलो नाही. इथले वातावरण आणि शहरीकरण तसेच माणसं फणसासारखी गोड आहेत. आगरी-कोळी आणि इतर समाजाचे त्यांनी कौतुक केले.
प्रारंभी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे यांना ‘तरुणोत्तम’, डॉ. प्रकाश पाटील यांना ‘विज्ञानेश्वर’, ज्येष्ठ गायक निवृत्तीबुवा चौधरी यांना ’पुण्यभूषण’, रायगड जिल्हा महिला आयोगचे सदस्य संजय जाधव यांना ‘धुरंधर’ तर उद्योजक सूरदास गोवारी यांना ‘फिनिक्स पुरस्कार’ हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच 81 व्या वर्षात पदार्पण आणि भावसरगमचे 51 वर्षाचे यश अधोरेखित करत मंगेशकरांचा, मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रतिष्ठानच्या ‘निर्भीड दिनदर्शिके’चे प्रकाशन करण्यात आले.
प्रस्तावित करताना अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. पनवेल संघर्ष समितीच्या कामाचीही माहिती त्यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘अविचित परिमळू’ या अभंगवाणीने भावसरगमची सुरुवात तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यांनी सादर केलेली कोळी गीते, वर्सोवा येथील भेटीतील त्यांचे काही अनुभव, कोळी समाजाची जीवनशैली यावर त्यांनी भाष्य करत गाण्यांची रंगत वाढवली. भावगीते, मराठी गज़ल आणि मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या बंदिश त्यांनी सादर केल्या. गोमू संगतीनें माझ्या तू येशील का …?, वादळ वारं सुटलं रे…. राजा सारंगा…. वल्हव रे नाखवा… जांभूळ पिकल्या झाडाखाली या गाण्यांची रसिकांनी मजा लुटली. अक्षरशः त्यांनी फेर धरला होता. म्पी थिअटर आणि आकाशाच्या पोकळीत फक्त ‘भावसरगम’च्या मैफिलीचीच जणू सुरावट भरून राहिली होती, असे अविस्मरणीय क्षण लुटले जात होते.
खारघरच्या इतिहासात आतपर्यंत झालेल्या गर्दीचा उच्चांक मोडणारा कार्यक्रम ठरल्याने प्रेषकांनी कांतीलाल कडू यांना भेटून समाधान व्यक्त केले.
माजी आमदार विवेक पाटील, राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हा प्रमुख व नगरसेवक सतीश पाटील, डॉ. अशोक पाटील, सिडकोचे कार्यकारी अभियंता गजानन दलाल, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप माने, शिवसेनेचे नेते बबनदादा पाटील, शिरीष घेत, रमेश गुडेकर, कॉँग्रेस नेते डॉ. भक्तीकुमार दवे, शशिकांत बांदोडकर, डॉ. जयश्री पाटील, डॉ. चंदन ठाकूर, वैभव गायकर, भाजपा नेत्या रूपा सिन्हा, माजी नगरसेविका शशिकला सिंह, संध्या दांडेकर, श्वेता गायकर डॉ. वैभव दाभणे, जनार्दन ठाकूर, ज्ञानदेव म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत आनंद पाटील, प्रशांत गाला, दया पाटील, नारायण म्हात्रे, सुरज म्हात्रे, मंगल भारवाड, रमेश फुलोरे यांनी केले.