दिपक देशमुख
नवी मुंबई : गेल्या पाच वर्षापासून मनपाच्या परिवहन विभागाचा सांभाळ एक प्रभारी अधिकारी हाकत असल्यामुळे आयुक्त व महापौरांनी परिवहन विभागाची झाडाझडती घेऊन फायदा काय असा सवाल खुद्द अधिकारी व कर्मचार्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे पहिले योग्य असा अधिकारी परिवहन विभागाला सेनापती आणा तरच परिवहन विभागाचा गाडा चांगला चालेल अशी मागणी होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासन परिवहन विभागाचा अधिकारी एक प्रतिनियुक्ती वर आणला जात असून त्यांना सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून पदावर बसवला जाणार आहे. त्यामुळे परिवहनला काय फरक पडणार आहे असा सवाल विचारला जात आहे.
मनपाच्या परिवहन विभागासाठी अतिरिक्त जिल्हा अधिकारी दर्जाचा अधिकारी असणे गरजेचे आहे. २०१३ पर्यंत अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचाच अधिकारी परिवहनमध्ये आले होते. त्यांनी काम पाहिले होते. २०१३ मध्ये शेवटचे मांगले नावाचे अधिकारी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यांची बदली झाल्यापासून गेल्या पाच वर्षापासून अभियांत्रिकी विभागाचे अभियंता शिरीष आरदवाड हे प्रभारी म्हणून महाव्यवस्थापकाचे कार्यभाल सांभाळत आहेत. परंतु दुर्दैवाची परिस्थिती म्हणजे अजूनही परिवहन विभागाला अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळाला नाही.यावर कणखर अधिकारी आलेले तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेही काही करू शकले नाही हे विशेष.
मुख्य अधिकारीपदी जरी शासनाकडून कोणताही अधिकारी आला नसला तरी परिवहनचा गाडा चालला असला तरी अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. त्यामध्ये घणसोली डेपो ठेकेदारांच्या हातात देणे, नियमबाह्य बढत्या देणे, बसच्या दुरुस्त्या व्यवस्थित न होणे तसेच अधिकारी व कर्मचार्यांना योग्य वागणूक न देणे, चालक व वाहकांच्या मनात सातत्याने भीती असणे अशा प्रकारच्या निर्णयामुळे परिवहन विभागाची प्रगती खुंटली असल्याचे वास्तव आहे.
सध्या प्रभारी महाव्यवस्थापक पदावर असणारे शिरीष आदरवाड याना उपअभियंता या पदावरून शासनाची मान्यता नसतानाही कार्यकारी अभियंता यापदावर मनपाने बसविले. त्यानंतर परिवहन मंडळाने त्यांना गेल्या पाच वर्षे महाव्यवस्थापक पदावर बसविले आहे. यामागे कोणते गणित आहे चांगल्या तत्वज्ञान्याला ही न समजण्याच्या पलीकडे असल्याचे बोलले जात आहे. यामागे परिवहन सदस्यांना लक्ष्मी दर्शन तर होत नाही ना, असाही सूर आळवला जात आहे.
नुकतीच मनपा आयुक्त एन. रामास्वामी व महापौर जयवंत सुतार यांनी परिवहन विभागाच्या डेपोना भेटी देऊन झाडाझडती घेतली. परंतु यामुळे परिवहन विभागाला गती मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर परिवहन विभागाला गती द्यायची असेल तर शासनाच्या नियमानुसार महाव्यवस्थापकपदी अतिरिक्त जिल्हाधिकारी कॅडरचा अधिकारी आयुक्तांनी आणला पाहिजे. परंतु अश्या प्रकारच्या हालचाली सध्यातरी मनपा प्रशासन मध्ये होत नसल्याने अधिकारी व कर्मचार्यांमध्ये नाराजी पसरली आहे.जिथं पर्यंत अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्ज्याचा अधिकारी मनपा परिवनला मिळत नाही तो अपेक्षित प्रगती होणार नाही. त्यामुळे आयुक्तांनी याचा विचार करावा अशी मागणी होत आहे.
सध्या महाराष्ट्र शासनच्या परिवहन विभागातील एक अधिकारी सहाय्यक महाव्यवस्थापकपदी आणण्याचा घाट घातला जात आहे. त्या अधिकार्याला जरी आणले तरी तो अधिकारी प्रभारी महाव्यवस्थापक शिरीष आदरवाङ यांच्या खालचा अधिकारी असणार आहे. त्यामुळे आदरवाड यांच्यावर परिवहन मंडळाचा प्रेम इतका का उतू जात आहे असा प्रश्न विचारला जात आहे.
या बाबत महापौर जयवंत सुतार यांना विचारले असता, सध्या मी पाहणी दौरा सुरू केला असून महाव्यवस्थापक विषयी योग्यवेळी निर्णय घेऊ असे सांगितले. तर परिवहन सभापती प्रदीप गवस यांना विचारले असता ,आदरवाड यांना चांगला अनुभव असल्यामुळे त्यांना ते पद दिले आहे असे सांगितले.परंतु अधिक माहिती दिली नाही.