सुजित शिंदे : ९६१९१९७४४
नवी मुंबई : तुर्भे सानपाडा एमआयडीसील मोडेको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्पोट होऊन रविवारी दुपारी ४ च्या दरम्यान मोठी आग लागली . स्फोटाची तीव्रता खूप मोठी असल्याने आजूबाजूच्या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी व आजूबाजूला राहणार्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे लोट आकाशात खूप उंचावर दिसत होते.
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न रविवारी रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. ही आग प्रचंड होती. त्यामुळे ही बाजूच्या कंपनी मध्ये देखील पसरली . कंपनीतील सात ते आठ कामगार गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुपारी ४ वाजता लागलेली आग रात्रीचे १० वाजली तरी सुरूच होती. आग सुरू असताना स्फोटासम आवाज सारखे सुरू होते. हे आवाज तुर्भे एमआयडीसीपुरतेच सीमीत न राहता सानपाडा,जुईनगरपर्यत ऐकायला जात होते. या स्फोटामुळे कंपनीशेजारील परिसरातील इमारतीच्याही काचा खाली तुटून पडल्या. या आगीमध्ये सात ते आठ कर्मचारीही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कंपनीत आग भडकलेली असताना कंपनीच्या प्रवेशद्वारालगतच एक गॅस सिलेडंरने भरलेला टॅकर उभा होता. सुमारे दोन तासाने हा टॅकर हटविण्यात आला. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत होते. अनेकदा अग्निशमनच्या जवानाना पाणीही आग विझविण्यासाठी उपलब्ध झाले नाही. शेजारील कंपन्यांकडे पाण्यासाठी अग्निशमनच्या जवानांना धावपळ करावी लागली. आगीमुळे सभोवतालच्या कंपन्याही तात्काळ खाली करण्यात आल्या. कंपनीत रासायनिक साठा असल्यामुळे सतत स्फोटाचे आवाज येत होते. एकदा तर स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की आगीचे फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या पत्रकारांना व छायाचित्रकारांनाही पळ काढावा लागला. आकाशामध्ये सुमारे सहा ते सात तास धुराचे लोटच्या लोट पहावयास मिळत होते. या आगीमुळे पोलीसांचे तसेच अग्निशमच्या जवानांचेही डोळे चुरचुरू लागले होते. काही वेळातच कंपनीतल्या रसायनाचाही वास बाहेर येवू लागला होता. सांयकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास स्फोटाच्या आवाजाने कंपनीचे छतही उडाले आणि अग्निशमनच्या जवानांना थेट कंपनीमध्ये पाणी फवारण्याची संधी उपलब्ध झाली. ही आग पाहण्यासाठी परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. लगतच्या टॉवरवर जावूनही बघ्यांची गर्दी आग पाहत होती. आगीच्या वेळेस कोणतीही दुर्घटना होवू नये म्हणुन कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.