मुंबई : पंतप्रधानांसह निम्मे केंद्रीय मंत्रीमंडळ, तेरा राज्याचे मुख्यमंत्री, मदतीला सरकारी यंत्रणा, आणि प्रशासन या सर्वांविरोधात राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी गुजरातचा निकाल उत्साहवर्धक असून गुजरात मध्ये भाजपचा नैतिक पराजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
पंतप्रधानापासून भाजप अध्यक्षापर्यंत अनेक मंत्री व भाजप नेत्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन काँग्रेस अध्यक्ष आणि नेत्यांवर केलेली टीका, गलिच्छ प्रचार,पोलीस, प्रशासनाला हाताशी धरून निवडणुका जिंकण्यासाठी केलेल्या डर्टी ट्रिक्स यामुळे १५० जागा जिंकण्याच्या वल्गना करणा-या भाजपाला तीन अंकी आकडा ही गाठता आलेला नाही. भाजपने आपल्या प्रचारात कुठेही विकासाचा उल्लेख केला नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर खोटे नाटे आरोप केले. औरंगजेब आणि पाकिस्तान यांच्या नावाचा वापर करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. याउलट या सर्वांवर मात करत काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर गुजरात विधानसभेची निवडणूक लढवली आणि गेल्या निवडणुकीपेक्षा 20 जागा जास्त जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. या निवडणुकीमध्ये राहूल गांधी एक लढवय्या योध्दा म्हणून समोर आले आहेत. हा निकाल देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक असून आगामी राज्य आणि देश पातळीवरील निवडणुकांमध्ये राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भाजपला पराभवाची धूळ चारल्याशिवाय राहणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.