दिपक देशमुख
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये सोमवारी तब्बल ७५० वाहनांतून भाज्यांची विक्रीसाठी आवक झाली. यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, भेंडी, वाटाणा, सुरण, काकडी, भोपळा, गाजर, फ्लॉवर, वांगी, कोबी यांचा अधिक समावेश आहे. गुजरात निवडणूकीमुळे गेली दोन दिवस गुजरातहून भाज्या विक्रीसाठी आल्या नाहीत. बुधवारी भाजी मार्केटमध्ये विक्रमी आवक होण्याची शक्यता व्यापार्यांकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे भाज्यांची दिवसेंदिवस विक्रमी आवक होत असताना मार्केटमध्ये खरेदीदार फारसे येत नसल्याने पहाटे चार वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यत व्यापार्यांना ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागत असल्याचे गाळ्यागाळ्यावर पहावयास मिळाले.
पालेभाज्यांमध्ये कडीपत्ता १५ ते २० रूपये किलो, कांदापात नाशिकची ६ ते ७ रूपये जुडी, कांदापात पुण्याची ३ ते ४ रूपये जुडी, कोथिंबीर नाशिकची १२ ते १४ रूपये जुडी, कोथिंबीर पुंण्याची ५ ते ७ रूपये जुडी, मेथी नाशिकची ५ ते ७ रूपये जुडी, मेथी पुण्याची ३ ते ५ रूपये जुडी, मुळा १० ते १५ रूपये जुडी, पालक नाशिकची ३ ते ५ रूपये जुडी,पालक पुण्याची २ ते ४ रूपये जुडी, नाशिकचा पुदीना १ ते २ रूपये जुडी, नाशिकची शापु ८ ते १० रूपये जुडी, शापु पुण्याची जुडी ५ ते ६ रूपये जुडी या भावाने विकली गेली. टॉमटो ५ ते १० रूपये किलो, सुरण १२ ते १७ रूपये किलो, शिराळी दोडका २५ ते ४० रूपये किलो, भेंडी १० ते २५ रूपये किलो, फ्लॉवर ४ ते ६ रूपये किलो, गवार २० ते ३५ रूपये किलो, कोबी ६ ते १० रूपये किलो, बीट ८ ते १० रूपये किलो, कारली १५ ते २२ रूपये किलो, ढोबळी मिरची १८ ते २६ रूपये किलो, वाटाणा १६ ते २४ रूपये किलो, वालवड ८ ते १२ रूपये किलो, वांगी ४ ते १० रूपये किलो, लवंगी मिरची १८ ते २२ रूपये किलो, ज्वाला मिरची १६ ते २२ रूपये किलो या दराने भाज्या विकल्या गेल्या. दुपारचे ३ वाजले तरी गाळ्यावर भाजी विकण्यासाठी व्यापारी थांबलेले पहावयास मिळाले. बुधवारपासून आवक ही ९०० पेक्षा अधिक गाड्यातून होण्याची शक्यता असल्याने भाज्यांचे भाव कोसळण्याची शक्यता असून यात शेतकरी राजा मात्र भरडला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनसेने फेरीवाल्यांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनामुळेही बाजार समितीमधील फळ, भाजी व कांदा बटाटा मार्केटच्या अर्थकारणावरही परिणाम झाला आहे. अनेक भागातील पदपथावर फेरीवाल्यांना व्यवसाय करणे अवघड झाल्यामुळे संबंधित फेरीवाले मार्केटमध्ये येत नाही. त्यामुळे ३५ ते ४० टक्के खरेदीदार मार्केटमध्ये येणे बंद झाल्याचे मार्केटमधील व्यापार्यांकडुन सांगण्यात येत आहे. मार्केटमध्ये वाढती आवक, परराज्यातील भाज्यांचा विक्रमी ओघ, खरेदीदारांचा अभाव यामुळे हॉटेल व्यावसायिकांना स्वस्तात भाज्या उपलब्ध होवू लागल्या आहेत. एकीकडे मार्केटमध्ये खरेदीदार नसल्याने गाळ्यावर व्यापार्यांना पहाटे चार वाजल्यापासून दुपारी दोन ते तीन वाजेपर्यत खरेदीदारांची प्रतिक्षा करत मिळेल त्या भावाने भाज्या विकाव्या लागत असल्या तरी किरकोळ मार्केटमध्ये खर्या ग्राहकांना भाज्या विकणार्या किरकोळ विक्रेत्यांचे मात्र उखळ पांढरे होवू लागले आहे.