सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कधी अ वर्ग खरेदीदार प्रकरण तर कधी गाळ्याचे प्रकरण, अग्निशमन यंत्रणेचा अभाव, बाजारभावापेक्षा स्वस्तात जागेची विक्री यासह अन्य घोटाळ्यांमुळे सतत गाजतच असते. कृषी मालाच्या अवैध वाहतुक व अनधिकृत विक्री यातून काही घटकांनी त्याविरोधात कार्य करणार्या काही वर्षापूर्वी बाजार समितीचे सचिव अण्णासाहेब गोपाळराव तांभाळे यांची बाजार समिती मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापाशीच निर्घृण हत्याही केली होती. बाजार समितीमधील अर्थकारण हा एकाद्या महापालिकेपेक्षा मोठे आहे. या बाजार समितीचे ऑडिट (लेखापरिक्षण) गेल्या २०१३ पासून आजतागायत झालेले नाही. या चार वर्षात ऑडिटचा अहवालच न आल्याने मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला असण्याची भीती बाजार आवारातील घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधला असता, बाजार समितीचे ऑडिट हे राज्य सरकारच्या सहकार विभागाकडून होत असते. सहकार विभागाच्या अखत्यारित बाजार समितीचे ऑडिट असल्याने कधी ऑडिट करायचे व अहवाल कधी प्रसिध्द करायचे हे सहकार विभागच निश्चित करत असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास बाजार समिती प्रशासनाने नकार दिला.
बाजार समितीच्या ऑडिटबाबत काही आरटीआय कार्यकर्त्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे माहितीच्या अधिकाराखाली विचारणा केली असता, २०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन आर्थिक वर्षाचे ऑडिट झाले असून त्याचा अहवाल बाजार समितीला मिळालेला नाही आणि त्यानंतर ऑडिट झाले नसल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून लेखी कळविण्यात आले आहे.
यासंदर्भात बाजार समिती प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा शनिवारी प्रयत्न केला असता, बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी कार्यालयात उपलब्ध नव्हते. त्यानंतर बाजार समिती सचिव पहिनकर यांना संपर्क केला असता, त्यांनी आपण बैठकीत व्यस्त असल्याचे सांगत सहसचिव अविनाश देशपांडे यांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर अविनाश देशपांडेही कार्यालयात नसल्याचे पहावयास मिळाले. आज सोमवारी पुन्हा एकवार बाजार समिती मुख्यालयात बाजार समिती प्रशासक सतीश सोनी यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्यांच्या कार्यालयात चिठ्ठी देवूनही सुमारे तासभर ताकटळत ठेवूनही भेटीसाठी विशेष स्वारस्य दाखविले नाही. कार्यालयातील अन्य कर्मचार्यांकडे चौकशी केली असता, सिडकोचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदूराव यांची सरबराई करण्यात बाजार समिती प्रशासक व्यस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका राजकारण्याची सरबराई करण्यात सरकारने बाजार समितीवर नियुक्त केलेला प्रशासक इतके विशेष स्वारस्य का दाखवित आहे, याबाबत अधिक चौकशी केली असता, कल्याण येथील बाजार समितीमधील त्यांच्या मधुर संबंधाबाबतची विशेष माहिती प्राप्त झाली. कल्याण बाजार समितीवर प्रमोद हिंदूराव अध्यक्ष असताना प्रशासक सोनी तेथील सचिव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच ऑडिटविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या पत्रकारांना ताटकळत ठेवून कल्याणच्या आठवणींना उजाळा देत हिंदूरावांचा पाहूणचार घेतला असल्याची खमंग चर्चा बाजार समिती मुख्यालयात सुरू आहे.