आमदार संदीप नाईक यांच्या तारांकीत प्रश्नाला पर्यावरणमंत्र्यांचे लेखी उत्तर
एका कंपनीला उत्पादन बंदचे आदेश
९ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस
नागपूर | प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांमध्ये नवी मुंबई शहरात वाढलेल्या जल आणि वायू प्रदूषणाचा गंभीर विषय तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून आमदार संदीप नाईक यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी मांडला असता शहरातील प्रदूषणाबाबत सरकारने कबुली दिली असून यावर कारवाई करीत एका कंपनीला उत्पादन बंदचे आदेश देण्यात आले आहेत. तर ९ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची लेखी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.
नवी मुंबईत वाढत्या जल आणि वायू प्रदूषणामुळे नागरिकांची घुसमट होेते आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी याबाबत आमदार नाईक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची तत्परतेने दखल घेत अलिकडेच आमदार नाईक यांनी एमआयडीसी क्षेत्राचा पाहणी दौरा करुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांकडे प्रदूषणकारी घटकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. ठाणे-बेलापूर औद्योगिक पटटयातील अनेक कंपन्या नियमांचे उल्लंघन करुन रात्रीच्या वेळेस विषारी वायु वातावरणात सोडतात. प्रक्रीया न करता रासायनिक पाणी नवी मुंबईतील नाल्यांमध्ये सोडत आहेत, असा प्रकार सप्टेंबर २०१७ मध्ये किंवा त्या दरम्यान निदर्शनास आला आहे काय?, नवी मुंबईमध्ये हजारो वाहनांमुळे मोठया प्रमाणावर वायू प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय? अशी विचारणा आमदार नाईक यांनी तारांकीत प्रश्नात केली होती. शहरातील वायू व जल प्रदुषण रोखण्याकडे प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष होत असल्याने ऑगस्ट २०१७ मध्ये आमदार नाईक यांनी शहरातील प्रदुषण रोखण्यासाठी पर्यावरणमंत्री कदम यांना निवेदन दिले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने प्रदुषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत तसेच संबंधीत कंपन्यांवर कोणती कारवाई केली आहे? याबददल या तारांकीत प्रश्नात विचारणा केली होती. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आपल्या लेखी उत्तरात वाढत्या वाहनांमुळे नवी मुंबईत वायू प्रदुषणाची समस्या अंशतः निर्माण झाल्याची कबुली दिली आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये प्रदुषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीत क्राउन पेट्रोलियम प्रोडक्टस या कंपनीकडून औद्योगिक सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याचे निष्पन्न झाल्याने या कंपनीला औद्योगिक उत्पादन बंदचे आदेश देण्यात आले आहेत. चार उद्योगांनी संमती पत्राच्या अटींची पुर्तता केली नाही. त्यामुळे या उद्योगांचे प्रस्तावित आदेश आणि पाच उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
आमदार नाईक यांनी नवी मुंबईतील वाढत्या प्रदुषणाला विधीमंडळ अधिवेशनात वाचा फोडल्याने औद्योगिक पटटयातील प्रदुषणकारी कंपन्यांना चाप बसणार आहे. तसेच वाढत्या वायू प्रदुषणावर सरकारला देखील उपाययोजना करणे भाग पडणार आहे.