उपक्रमाचे अकराव्या वर्षात यशस्वी पदार्पण
सुजित शिंदे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : दहावीच्या मुख्य परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी नवी मुंबई शिक्षण संकुलाची बोर्डाच्या धर्तीवरील एसएससी सराव परीक्षा आज शनिवार २३ डिसेंबर २०१७ पासून सुरु होत असून ती ७ जानेवारी २०१८ पयर्ंत सुरु राहणार आहे. या परिक्षेसाठी प्रवेश विनामूल्य असतो.
तुर्भे येथील सामंत विद्यालयात दुपारी दीड वाजता लोकनेते गणेश नाईक यांच्या शुभहस्ते या एसएससी सराव परिक्षेचा शुभारंभ होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, परिक्षेचे आयोजक आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, परिक्षेचे मुख्य प्रबंधक नगरसेवक अनंत सुतार, मुख्य समन्वयक प्रा. प्रताप महाडीक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी या उपक्रमाने अकराव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. सलग ११ वर्ष सराव परीक्षा घेण्याचा हा राज्यातील बहुदा पहिलाच उपक्रम असावा. नवी मुंबई आणि परिसरातील १० हजार ६०० विद्यार्थी या परिक्षेत सहभागी झाले आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी उर्दू या माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. बोर्डाच्या मुख्य परीक्षेसारखा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी बोर्डाच्या धर्तीवरच तज्ञ शिक्षकांमार्फत प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात. नवी मुंबईतील विविध शाळांमधील तज्ञ शिक्षकांमार्फत या प्रश्नपत्रिका तपासल्या जातात. एकूण २५ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.
आधुनिक आणि स्मार्ट अशा नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी देखील स्मार्टपणे शालांतच्या मुख्य परीक्षेस सामोरे जावे आणि यश संपादन करावे, या उददेशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या एसएससी सराव परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याचे दिसून आले आहे. विशेषतः पालिकेतील शाळांमधून शिकणार्या सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना महागडे कोचिंग क्लास परवडत नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सरावासाठी पर्वणीच असते, अशी माहिती परिक्षेचे आयोजक आमदार संदीप नाईक यांनी दिली आहे.