बारावीसाठीही सराव परिक्षा घेण्याचे लोकनेते गणेश नाईक यांचे सुतोवाच
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई शिक्षण संकुल आणि श्रमिक शिक्षण मंडळ आयोजित एसएससी बोर्डाच्या धर्तीवरील एसएससी सराव परिक्षेस यावर्षी १२ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले असून मागील ११ वर्षात एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परिक्षा देवून एसएससीच्या मुख्य परिक्षेत धवल यश प्राप्त केले आहे.
तुर्भे येथील सामंत विद्यालयात शनिवारी लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत एसएससी सराव परिक्षेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, परिक्षेचे आयोजक आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, सभागृहनेते रविंद्र इथापे, जिल्हाध्यक्ष आणि परिक्षेचे मुख्य प्रबंधक अनंत सुतार, नगरसेविका शशिकला पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक पाटील, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेशदादा नाईक, मुख्याध्यापक सुधीर थळे, प्राचार्य तथा परिक्षेचे मुख्य समन्वयक प्रताप महाडीक, मुख्याध्यापक राठोड, शेतकरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी राजाराम भोईर, संजय पाटील, शांतराम घरत, गोपिनाथ पाटील, राम पाटील, पार्श्वा एज्यु मेंटोरचे समीर घोटालीया, समाजसेवक परशुराम ठाकूर, सेवादल उपाध्यक्ष मोहन बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकनेते नाईक यांनी सराव परिक्षेच्या उपयुक्ततेचे कौतुक केले. ११ वर्षात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली असल्याचे ते म्हणाले. माजी शिक्षणमंत्री पतंगराव कदम यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करुन संपूर्ण राज्यात अशाप्रकारची परिक्षा कुठेच होत नाही, या शब्दात या उपक्रमाचा गौरव केला होता. एसएससीप्रमाणेच बारावीची सराव परिक्षा देखील घेण्याची विद्यार्थी आणि पालकांची मागणी वाढते आहे. त्या अनुशंगाने या उपक्रमाच्या पुढील १२व्या वर्षी बारावीची सराव परिक्षा देखील सुरु करावी, असा सल्ला लोकनेते नाईक यांनी नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या पदाधिकार्यांना दिला. या उपक्रमाची सुरुवात संजीव नाईक यांच्या माध्यमातून झाली. गेले आठ वर्षे आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली या परिक्षेचे सुंदर आयोजन करण्यात येते आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे, असे सांगून आमदार नाईक यांच्यासह या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी समर्पित भावनेने सहकार्य करणार्यांचे कौतुक केले. लोकनेते नाईक यांचे आठवी ते दहावीपर्यतचे शिक्षण सामंत विद्यालयातच झाले आहे. विद्यालयातील शालेय जीवनाला देखील त्यांनी याप्रसंगी उजाळा दिला.
या वर्षी एसएससी सराव परिक्षेला १२ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा भरधोस प्रतिसाद मिळाल्याची माहिती आमदार संदीप नाईक यांनी प्रास्ताविक करताना दिली. मुख्य परिक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा सराव व्हावा, मुख्य परिक्षेची त्यांच्या मनातील भिती दूर व्हावी, त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा, निकालाची गुणवत्ता वाढावी या साठी सराव परिक्षा लाभदायक ठरल्याचे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. राज्यातील १३०० शासकीय शाळा बंद होत असताना नवी मुंबईतील पालिका शाळांमधून मात्र चांगली पटसंख्या असल्याचे सांगून लोकनेते नाईक यांच्या शिक्षण व्हिजन धोरणामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. सराव परिक्षा यशस्वी करण्यासाठी योगदान देणार्या सर्व घटकांचे आमदार नाईक यांनी आभार मानले.
लोकनेते नाईक यांच्या प्रेरणेतून नवी मुंबई पालिका शाळांतील शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल झाले असून शिक्षणाची गुणवत्ता वाढल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी स्पष्ट केले. लोकनेते नाईक यांच्या सुचनेप्रमाणे शिक्षणाकरीता पालिकेच्या बजेटमध्ये निधी वाढविण्यात येईल, असे जाहिर केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी केले
आय स्कोर ऍपचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप
एसएससी सराव परिक्षेच्या शुभारंभाप्रसंगी आय स्कोर या सराव प्रश्नपत्रिका ऍपचे उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले. या परिक्षेला बसलेल्या १२ हजार विद्यार्थ्यांना या ऍपचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. या ऍपच्या सहायाने दहावीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमात उपलब्ध आहेत. ऍपच्या सरावातून विद्यार्थ्यांच्या निकालाची गुणवत्ता वाढीस लागणार आहे. पार्श्वा एज्यू मेंटर या कंपनीने हे ऍप तयार केले आहे.
८६ शाळांचा सहभाग
एसएससी सराव परिक्षेत यावर्षी एकूण ८६ शाळांचा सहभाग असून त्यापैकी १६ शाळा नवी मुंबई पालिकेच्या आहेत. एकूण २५ विविध परिक्षा केंद्रांवर ही परिक्षा घेतली जाणार आहे. केंद्रीकृत तपासणी केंद्र, एसएससी बोर्डाच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका, हॉल तिकिट वाटप अशी प्रक्रीया राबविली जाते. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या चार माध्यमांतून ही परिक्षा घेतली जाणार आहे.