मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण
मुंबई : निरोगी राष्ट्र हेच समृद्ध राष्ट्र बनू शकते हे लक्षात घेतले तर मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.
“द योगा इन्स्टिट्युट”, मुंबई या संस्थेच्या शतक महोत्सवी समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, संस्थेच्या संचालिका हंसा जयदेव,योग क्षेत्रातील मान्यवर पद्मश्री नागेंद्र, पद्मश्री ङॉ. डी. आर कार्तिकेय, बसावा रेड्डी, स्वामी चिदानंद सरस्वती, आचार्य लोकेश मुनी, सुबोध तिवारी, ऋषी जयदेव योगींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
काम, ज्ञान आणि समर्पण या तीन गोष्टींचा समन्वय झाला तर हाती घेतलेले काम अधिक उत्कृष्टपणे पूर्णत्वाला जाऊ शकते. योग संस्थेने या तीन गोष्टींचा आपल्या कार्यात अंतर्भाव केल्याने ही संस्था केवळ एक संस्था न राहाता ती एक जीवनशाळा झाली आहे. संस्थेने भारतीय प्राचीन विज्ञानाचा भाग असणारे योग शिक्षण घराघरात पोहोचवले आहे, असे गौरोवोद्गार श्री. नायडू यांनी यावेळी काढले. ते पुढे म्हणाले की, संस्थेचे योग प्रशिक्षण आणि प्रचाराचे कार्य अलौकीक आहे. जागतिकस्तरावर काम करणारी ही एक महत्वपूर्ण संस्था असल्याचेही ते म्हणाले.
योग हा जीवनाचा समग्र दृष्टीकोन असल्याचे सांगून श्री. नायडू पुढे म्हणाले की, योग शिक्षण केवळ शरीर निरोगी ठेवते असं नाही तर मनाला निरोगी ठेवण्याचं काम ही नियमित योगातूनच होते. शारीरिक, अध्यात्मिक आणि भावनिक संतुलनाबरोबर कृतिशील समाज निर्मितीमध्ये योग महत्वाचा ठरतो. कामामधील एकाग्रता वाढवण्यास योग उपयुक्त ठरतो. बदलल्या जीवनशैलीमुळे हालचालींवर मर्यादा आली आहे, वाढत्या स्पर्धेमुळे भावनिक असंतुलन निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर शांत आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग योगाच्या माध्यमातूनच मिळू शकतो.
तरूण पिढीने जन्मदात्री, जन्मभूमी, मातृभाषा, देश आणि गुरु या पाच गोष्टींना आपल्या आयुष्यात विशेष महत्व द्यावे, त्याचा कधीही विसर पडू देऊ नये असे सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठपुराव्यामुळे सन २०१४ पासून २१ जून हा दिवस “जागतिक योग दिवस” म्हणून साजरा होत असल्याचा आवर्जुन उल्लेख केला.
कार्यक्रमात इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली त्याचबरोबर संस्थेची माहिती सांगणारी एक ध्वनी चित्रफीतही यावेळी दाखवण्यात आली. संस्थेच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.