नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्टेशनसमोरील बॅक ऑफ बरोडामध्ये भुयार खोदून दरोडा घडल्याची घटना नवीन असतानाच नवी मुंबईतील बॅका व पतसंस्था त्यातून ग्राहकांच्या पैशाच्या सुरक्षेविषयी कोणताही बोध घेण्यास तयार नसल्याचे नेरूळमधील धनवर्षा पतसंस्थेवर झालेल्या घरफोडी प्रकरणातून पहावयास मिळत आहे.
नेरूळ सेक्टर आठमध्ये धनवर्षा पतसंस्था कार्यरत आहे. दोन महिन्यापूर्वीच धनवर्षा पतसंस्थेच्या नेरूळ शाखेचे नेरूळ सेक्टर आठमधील शिवनेरी गृहनिर्माण सोसायटीमध्ये उद्घाटन करण्यात आले आहे. या पतसंस्थेने कोणताही सुरक्षा रक्षक ठेवला नसल्याचे तसेच पतसंस्थेच्या आतील व बाहेरील भागात सीसीटीव्हीदेखील लावला नसल्याचे घरफोडीच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
सोमवारी पतसंस्थेतील कर्मचार्यांना साप्ताहिक रजा असल्याने पतसंस्था बंद होती. याचाच फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचे शटर उचकटून ही चोरी केली. या चोरीचे वृत्त कळताच विविध दैनिकांच्या तसेच वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी पतसंस्थेत जावून चोरीबाबत विचारणा केली असता अवघ्या पाच ते दहा हजार रूपयांचीच चोरी झाल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. सातारा भागातील एका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराचे नाव घेत पत्रकारांना बातमी न छापण्याची दमदाटीही यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली. पत्रकारांनी याबाबत नेरूळ पोलिस ठाण्यात संपर्क केला असता, पतसंस्थेत घरफोडी झाली असून ५३ हजार ९०० रूपयांची चोरी झाल्याचे सांगण्यात आले.
बॅक ऑफ बरोडा घटनेनंतर नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नेरूळमधील आगरी-कोळी भवनात बॅका व पतसंस्थाच्या सदस्यांची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत संबंधितांना मार्गदर्शन करण्यासाठी आरबीआयचे अधिकारीही पोलिसांनी बोलविले होते. तथापि ग्राहकांच्या पैशाबाबत पतसंस्था व बॅका गांभीर्य बाळगत नसल्याचे धनवर्षा प्रकरणावरून पुन्हा एकवार स्पष्ट झाले आहे. बॅका व पतसंस्था सुरक्षा रक्षक ठेवत नसतील आणि सीसीटीव्ही लावत नसतील तर अशा पतसंस्था व बॅकामध्ये ग्राहकांचा पैसा कितपत सुरक्षित राहणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.