दिपक देशमुख
नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्टेशनसमोरील बॅक ऑफ बरोडामध्ये भुयार खोदून दरोडा घडल्याची घटना नवीन असतानाच जुईनगरमधील एसबीआय बॅकेचे एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला आहे. याबाबत नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेदरम्यान हे एटीएम मशिन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला आहे. या एटीएमसमोर रात्रीचा सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहून चोरट्यांनी हे कृत्य केले आहे. मंगळवारी सकाळी ग्राहक एटीएममध्ये पैसे काढण्यास गेले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. परंतु एटीएम फोडले आहे अथवा दुरुस्तीसाठी खोलले आहे याबाबत ग्राहक व रहीवाशी संभ्रमात होते. चोरट्यांनी एटीएम मशिनचा दरवाजा खोलून लॉकही तोडले होते. परंतु आतील लॉक व दरवाजा तोडता आला नाही व यात वेळ जात असल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढला असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत पत्रकारांनी जुईनगर एसबीआय शाखेत चौकशी केली असता, त्यांनाही हा प्रकार माहिती नव्हता. त्यांनी एटीएम मशिन मरोळ-अंधेरीच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले. तेथील बॅक कर्मचार्यांनीच मरोळला एटीएम मशिनविषयी कळविले. त्यानंतर पत्रकार नेरूळ पोलिस ठाण्यात गेले असता, बॅकेने याबाबत कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचे समजले. मंगळवारी रात्री बॅकेकडून पोलीस ठाण्यात एटीएम मशिनविषयी तक्रार दाखल केली. एटीएम मशिनमध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे आता चोरट्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.