सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : हाबर्र्र रेल्वेने प्रवास करणार्या रेल्वे प्रवाशांची साडेसाती संपण्याचे कोणतेही चिन्ह गेल्या आठ दिवसापासून पहावयास मिळत नाही. सातत्याने विविध समस्यांनी हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवासी त्रस्त झालेले असतानाच शनिवारी
नेरूळ आणि जुईनगर रेल्वे स्टेशनदरम्या जुईनगर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर रेल्वे रूळाचे कपलिंग तुटले. ही घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
यामुळे वाशीहून बेलापुरकडे जाणारी व बेलापुरहून वाशीकडे येणारी हार्बर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली. काही वेळातच रेल्वेच्या गाड्या एकामागोमाग एक उभ्या राहील्या. रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रेल्वे प्रवासी रेल्वे रूळावरूनच पायी चालत जुईनगर रेल्वे स्टेशनकडे येत होते. तुटलेली कपलिंग जोडण्यासाठी रेल्वेकडून अथक प्रयत्न सुरू होते. सुमारे दीड तासानंतर कपलिंगची दुरूस्ती झाली. दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी पहिली रेल्वे नेरूळवरून जुईनगरकडे आली.
हार्बर रेल्वेची सेवा बंद असली तरी ट्रान्स हार्बर रेल्वे मात्र सुरळीत होती. सातत्याने रेल्वे प्रवासामध्ये काही ना काही समस्या निर्माण होत असल्याने रेल्वे प्रवासी आपला संताप व्यक्त करताना पहावयास मिळाले.