सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : थर्टी फर्स्टच्या जल्लोषाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू असतानाच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या उलाढालीवर मात्र सुतकी अवकळा पसरली आहे.
शनिवारी सकाळी भाजी मार्केटमध्येतब्ल ६८१ वाहनातून भाज्या विक्रीसाठी आल्या आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासोबत केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश यासह अन्य राज्यातून येथे भाज्या विक्रीला आल्या आहेत. दुसर्या दिवशी रविवारी मार्केट बंद राहत असल्याने शनिवारी मार्केटमध्ये दोन दिवसाचा माल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असते. मात्र थर्टी फर्स्टमुळे दररोजच्या तुलनेत जेमतेम २५ ते ३० टक्केच ग्राहक मार्केटमध्ये आल्यामुळे या भाज्यांचे काय करायचे यामुळे गाळ्यागाळ्यातील व्यापार्यांच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहीला आहे.
गेली दोन महिने मार्केटमध्ये भाज्या स्वस्त दरातच विकल्या जात आहेत. या मार्केटची गरज ३५० वाहनांची असताना ६०० ते ७५० वाहनातून भाजी दररोज येत आहे. मागणीपेक्षा पुरवठा अधिक होत असल्याने अजून काही महिने भाज्यांचे भाव कोसळतच राहणार असल्याचे व्यापार्यांकडून सांगण्यात येत आहे. सोमवार २४ डिसेंबर ते शनिवार ३० डिसेंबर या कालावधीत तब्बल ३६२३ वाहनातून भाज्या विक्रीला आल्या. त्या तुलनेत भाज्या खरेदीसाठी ग्राहकच नसल्याने भाज्या स्वस्तात खरेदी करण्याची हॉटेल व्यावसायिकांना लॉटरी लागली.