सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : ज्वेल ऑफ नवी मुंबई पार्क मध्ये समाजकंटकांकडून महानगरपालिकेच्या मालमत्तेचे होणारे नुकसान रोखण्याकरिता व नागरिकांच्या सुरक्षतेकरिता सदर ठिकाणावरील वाहनतळ, एन्ट्री पॉईंट, टॉयलेट बाहेर, ओपन जिम जवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी समाजसेवक रविंद्र भगत यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. एन रामास्वामी, महापौर जयवंत सुतार, शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने नेरुळ येथे सुंदर असे ज्वेल ऑफ नवी मुंबई पार्क उभारले असून पार्कमध्ये वाहनतळ,टॉयलेट, ओपन जिम, स्ट्रीट लाईट, बेंचेस, जॉगिंग ट्रॅक, सुरक्षा रक्षक व इतर सुविधा दिलेल्या आहेत.
नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मुंबई व इतर ठिकाणावरील नागरिक ज्वेल ऑफ नवी मुंबई पार्क व तेथील निसर्गरम्य परिसर पाहण्याकरिता मोठ्या संख्येने येत असतात. गेल्या वर्षभरापासून सुरक्षारक्षक असतानादेखील ज्वेल ऑफ नवी मुंबई पार्क मधील स्ट्रीट लाईट,बेंचेस , ओपन जिम साहित्य यांची वारंवार मोडतोड झालेली पहावयास मिळत असल्याचे रवींद्र भगत यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे
ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात मॉर्निंग वॉक,इव्हिनिंग वॉक साठी येणारे जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, खेळाडू निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी येणारे नागरिक, शाळा – कॉलेज मधील तरुण तरुणी ,खेळण्याकरिता येणारे लहान मुले व त्यांचे पालक तसेच फोटोग्राफर यांच्या सुरक्षततेचा प्रश्न निर्माण झालेला असल्याची भीती रवींद्र भगत यांनी व्यक्त केली आहे.