सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नेरूळ मधील नियोजित उप प्रादेशिक कार्यालयास भूखंड बदलून देण्यास सिडकोची तयारी
नवी मुंबई :- नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर-19 येथील नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) व ट्रक टर्मिनलसाठी दिलेल्या भूखंडास तेथील स्थानिक रहिवाशींनी गेले अनेक दिवसांपासून विरोध दर्शवित आंदोलन सुरु केले असून सदर आर.टी.ओ. कार्यालय व ट्रक पार्किंग इतरत्र हलविण्यासंदर्भात आज बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या समस्येवर उचित कार्यवाही करण्याचे मान्य करीत सदर भूखंड बदलून देण्याचे यावेळी स्पष्ट केले.
नेरूळ सेक्टर-19 येथे नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) करिता भूखंड उपलब्ध करण्यात आला आहे त्या भूखंडाशेजारी निवासी क्षेत्र, अनेक सोसायट्या असून तेथील लोकसंख्या सुमारे 28 हजार इतकी आहे. समोरच वंडर्स पार्क उद्यान, परिसरात 3 शाळा-कॉलेज असून वंडर्स पार्क उद्यानात येणारे पर्यटक, शाळा-कॉलेजमधील येणारे अनेक विद्यार्थी तसेच सेवारस्ता (सर्विस रोड) हा अतिशय लहान असल्यामुळे अवजड वाहनांना वाहने वळविणे अशक्य आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसताना निवासी क्षेत्रात आर.टी.ओ. कार्यालय आल्यास त्याठिकाणी नोंदणीसाठी व ट्रक पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांमुळे परिसरात वाहतूक कोंडीसह गुन्हेगारी वाढली जाईल. त्यामुळे सदर कार्यालय निवासी क्षेत्रातून इतरत्र हलविण्याबाबत सिडको एम.डी. भूषण गगराणी यांची भेट घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सदर आर.टी.ओ. कार्यालयाकरिता दुसरा भूखंड दिल्यास आम्हाला मान्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आर.टी.ओ. कार्यालयासाठी दुसरा भूखंड देण्यात यावा अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली. सिडको एम.डी. भूषण गगराणी यांनी हि भूखंडाची जागा बदलून देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून सदर कार्यालयासाठी इतर ठिकाणी भूखंड देण्यास काहीही हरकत नसल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सांगितले.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगिलते कि निवासी लोकवस्ती असतानासुद्धा नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) ला भूखंड त्या ठिकाणी दिला कसा हा प्रश्न सुद्धा आम्हाला पडला आहे. आर.टी.ओ.चे जे काम चालू आहे त्या कामास स्थगिती देऊन सदर भूखंड रद्द करून आरटीओला पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात येईल असे भूषण गगराणी यांनी सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.