दिपक देशमुख
नवी मुंबई :- मुंबईतील आर्थिक सत्तास्थाने आणि बुलेट ट्रेन यासह फायदेशीर व विकासाला हातभार लावणारे प्रकल्प गुजरातमध्ये नेवून कोकणच्या पर्यावरणाला हानीकारक व जिविताला त्रासदायक ठरणारे रासायनिक प्रकल्प कोकणच्या माथी मारले जात असल्याचे सांगून उध्दव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढविला. जैतापुर प्रकल्पापाठोपाठ आता राजापुरमध्ये रिफायनरीचा प्रकल्प उभा केला जात आहे. गुजरातमध्ये विकासाची रांगोळी काढणार्या मेक इन इंडियातील प्रकल्पामुळे कोकणची राख होणार आहे. कोकणला भकास करू पाहणारा विकास शिवसेना कदापि सहन करणार नसल्याचे उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. रायासनिक प्रकल्पामुळे कोकणचे पर्यावरण व सौदर्य नष्ट होणार असल्याची चिंता व्यक्त करून उध्दव ठाकरे यांनी हे रासायनिक प्रकल्प गुजरातकडेही घेवून जा असा टोला केंद्र सरकारला लगावला.
ग्लोबल कोकण या महोत्सवात महाराष्ट्रातील युवकांना व्यवसाय मार्गदर्शन क्षेत्रात भरीव कार्य करणार्या सचिन धर्माधिकारी यांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ‘नवउद्योग निमार्र्ण गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू, आमदार भाई जगताप, आमदार अनिल परब, नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नाहटा, मिलिंद नार्वेकर, शिवराम पाटील, विजय माने, रोहीणी भोईर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रास्तविक किशोर धारिया यांनी केले.
अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. व्यवस्थित मनापासून काम केले तर यश मिळते. उद्योगधंदा निर्माण करण्यासाठी ध्येय व चिकाटी अंगी असली पाहिजे.मेहनत केली पाहिजे असे प्रतिपादन सचिन धर्माधिकारी यांनी केले आहे.
सचिन धर्माधिकारी :- बेरोजगारांना नोकर्या देण्यासाठी उद्योजक निर्माण झाले पाहिजे. अभ्यासू वृत्ती नसेल तर यश येत नाही. जे कराल ते अभ्यास करून करा.प्रश्न निर्माण झाले तरच उत्तर भेटते. व्यवसायात माणूस कधीही निवृत्त होत नाही. व्यवसाय हस्तांतर होतो. व्यवसायात संयम पाहिजे. वस्तू विकता आली नाही तर चिडचिड होते, राग येतो. अभ्यास केला तर असे होत नाही. आपण फोन अपडेट करतो, पण बुध्दी अपडेट करत नाही. म्हणून माणूस अपडेट होतो. नवनवीन शिका.गुणग्राहकता जोपासली पाहिजे. कोणत्याही मोहाला बळी पडू नका.नम्र राहा, उर्मट होवू नका. वैचारिक धन असणारा कधीही पराभूत होत नाही.
उध्दव ठाकरे :- अशा कार्यक्रमात बोलायची आमची पंचाईत होते. राजकारण्यांच्या आयुष्यात काटेरी झाडेच जास्त येतात.तुळस येत नाही.कोकण माझे आहे, कोकणी माणूस माझा आहे. तमाम कोकणवासी माझा पाठकणा आहे. धर्माधिकारी परिवाराची तिसरी पिढी लोकसेवा करत आहे. धर्माधिकारी परिवार हा समाजाचा दिपस्तंभ आहे.सागराला दिशा दाखविणारा दिपस्तंभ आहे. जी घराणेशाहीच टीका माझ्यावर होते, ती तुमच्यावर होत नाही. टीका कोणावर करायची व कशासाठी करायची.धर्माधिकारी परिवार स्वत:साठी नाही तर समाजासाठी काम करत आहे. शिवसेना २० टक्के राजकारणाचा भाग ही समाजसेवेसाठी करते. कोकणच्या विकासासाठी मी राजकीय जोडे बाहेर ठेवायला तयार आहे. विकासाचे स्वप्न दाखवून भकास करणे याला विकास म्हणत नाही. कोकण टिकला पाहिजे. न्याय हक्कासाठी लढणेे शिवसेनेचे काम आहे.करणारा करून जातो, पण कोकणला मात्र भोगावे लागते. कोकणचा निसर्ग टिकला पाहिजे. आयुष्याची राखरांगोळी करणारे प्रकल्प कोकणात नको.
एकनाथ शिंदे :- शक्ती आणि भक्तीचा मिलाफ या कार्यक्रमात झाला आहे. अंधारातून प्रकाशात समाजाला नेण्याचे काम धर्माधिकारी परिवाराने केले आहे. देशसेवेचे काम या परिवाराने केले आहे.
सुरेश प्रभू :- कोकणातील मालाला जागतिक बाजारपेठ मिळाली पाहिजे. सरकार तुमचे सोबत आहे. सरकारी योजनांचा फायदा कोकणवासियांनी घेतला पाहिजे. मासे, हळद, आंबा, कोकमसह कोकणच्या इतर मालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे. कोकणच्या मालाला मागणी आहे. कोकणचा माल जागतिक बाजारपेठेत गेला पाहिजे.लाकडी खेळणी फक्त सावंतवाडीतच बनतात. मेक इन कोकणच्या माध्यमातून कोकणचे नवनिर्माण झाले पाहिजे. कोकणात रोजगार निर्माण झाला पाहिजे.कोकणचे कोकणपण टिकले पाहिजे. पर्यावरणावर भर दिला पाहिजे.पर्यावरणावर प्रेम करणारा अशी उध्दव ठाकरेंची ओळख आहे. कोकणात पर्यटन वाढीस लागले पाहिजे.
**
दहाचा कार्यक्रम पावणे एक वाजता सुरू झाला. नऊ वाजल्यापासून सभागृहात हजारोच्या संख्येने गर्दी होती. कार्यक्रमास विलंब होवूनही सभागृहात शांतता होती. या कार्यक्रमात कोकणातील नवउद्योजकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमात इतर देशात माल पाठविणार्या दोन शेतकर्यांचाही प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार यावेळी करण्यात आला.