दिपक देशमुख
नवी मुंबई : आजही नवी मुंबईकर मोठ्या प्रमाणावर आधार कार्डपासून वंचित आहे. आधार कार्ड बनविण्यासाठी कार्यरत असणारी खासगी केंद्र सरकारने बंद केली आहे. महापालिका प्रशासनाने विभाग कार्यालयात आधार कार्ड केंद्र सुरू केली असली तरी तेथे सावळागोंधळ कायम आहे. नेरूळ येथील विभाग कार्यालयात आधार कार्ड केंद्राचा सावळागोंधळ सुरू असतानाच महापालिकेतील ब प्रभाग समिती सदस्य व सारसोळेतील विकासपर्व म्हणून मागील काही वर्षापासून ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज मेहेर यांनी जाब विचारला आणि अवघ्या पाचच मिनिटात सारसोळेकराचा उद्रेक पाहून आधार कार्ड केंद्र सुरू करावे लागले. मनोज मेहेरच्या कार्यप्रणालीची झलक तेथे उपस्थित असणार्या सारसोळे गावच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना जवळून पहावयास मिळाली.
महापालिका प्रशासनाकडून विभाग कार्यालयात आधार कार्ड केंद्र सुरू केली. दुपारी २ ते ६ या वेळेत आधार कार्ड केंद्र सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून जाहिर करण्यात आले. आधार कार्ड केंद्र सुरू करण्याची सकल्पना महापालिका प्रशासनाची असली तरी चमकेश नगरसेवकांनी व त्यांची तळी उचलण्यात धन्यता मानणार्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. तथापि आधार कार्ड केंद्र वेळेवर सुरू होते अथवा नाही, दररोज किती आधार कार्ड बनतात याचा आढावा घेण्यास या नगरसेवकांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी धन्यता मानली. परंतु ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होवून सामाजिक कार्यात आक्रमकता दाखविणार्या मनोज मेहेर यांच्या शब्दकोशात उदासिनता हा शब्द नाही. आधार कार्ड केंद्राबाबत सातत्याने विचारणा करणार्या मनोज मेहेर यांच्या उद्रेकाचा सामना आज नेरूळ विभाग कार्यालयात आधार कार्ड केंद्र कर्मचार्यांना व अन्य अधिकार्यांना करावा लागला.
आधार कार्डसाठी सकाळी ११ वाजल्यापासून लोक या ठिकाणी रांगा लावतात, दुपारचे अडीच वाजले तरी आधार कार्ड केंद्र सुरुच झाले नव्हते. तसेच महापालिका प्रशासनाकडून उपस्थित लोकांना कोणत्याही प्रकारची सूचना अथवा मार्गदर्शन केले जात नव्हते. याबाबत घटनास्थळी जावून परिस्थिती पाहिल्यावर मनोज मेहेर यांनी सारसोळेच्या सांस्कृतिक भाषेत पालिका प्रशासनाचा व अधिकारी, कर्मचारी यांचा निषेध करत विलंबाबाबत विचारणा केली. पालिका अधिकार्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून रांगा लावणार्या लोकांची परिस्थिती कथन केली. मनोज मेहेरचा उद्रेक पाहिल्यावर अवघ्या पाचच मिनिटात आधार कार्ड केंद्रचे कर्मचारी हजर झाले व तेथून पुढे नवीनच नाट्य सुरू झाले. चावी सापडत नव्हती. जी चावी सापडली, ती टाळ्याला लागत नव्हती. दहा मिनिटाच्या गोंधळानंतर आधार कार्ड केंद्र सुरू झाले. पालिका विभाग अधिकारी कार्यालयात आधार कार्ड केंद्र चालविणार्या लोकांवर पालिका प्रशासनाचा कोणताही अकुंश नसल्याचे व केंद्र वेळेवर सुरू होत नसल्याचे मनोज मेहेर यांच्या निदर्शनास आले. प्रभाग समितीच्या आगामी बैठकीत आपण पालिका प्रशासनाला याविषयी जाब विचारणार असल्याचे मनोज मेहेर यांनी उपस्थितांना सांगितले.
मनोज मेहेर यांनी सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाच्या विकासकामांकरिता आणि समस्या निवारणाकरिता साडे सात हजार लेखी निवेदनातून पाठपुरावा केलेला नवी मुंबईकरांच्या लक्षात आहे. आज विभाग अधिकारी कार्यालयात मनोज मेहेरची आक्रमकता व पाठपुरावा पाहिल्यावर नेरूळ सेक्टर सहामधील रांगेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांने यावेळी ‘टायगर अभी जिंदा है’ अशी मार्मिक प्रतिक्रियाही दिली.