संघर्ष समितीच्या मागणीवरून पनवेलमध्ये संपन्न झाली विविध विभागांच्या अधिकार्यांची बैठक
पनवेल : अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्य बळ जरी कमी असले तरी ठाण्यातील २९ अधिकार्यांची फौज रायगडला देवून पनवेल शहरासह तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांना नेस्तनाबूत केले जाईल. टपर्यांना सिल ठोकले जाईल तसेच न्यायदंडाधिकार्यांमार्फत प्रतिबंधनात्मक कारवाई करण्याचा ऍक्शन प्लॅन तयार केला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे कोकण विभागीय सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी बैठकीत दिली.
पनवेल संघर्ष समितीने नववर्षाला गुटखा मुक्त पनवेलसह रायगडचा संकल्प केला आहे. त्याकरीता नियोजन करण्यासाठी देशमुख यांच्या उपस्थितीत विविध अधिकार्यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात बोलाविली होती. त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.
याप्रसंगी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पनवेल ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. बंसराज लोहारे, जिल्हा परिषदेेचे तालुका आरोग्य अधिकारी नागनाथ यम्पल्लै, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वाय. एल. दौडे, प्रकाश वाघमारे, जिल्हा निरिक्षक दिलीप संगत, पनवेल विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब समुद्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी एल. बी. मोहिते, महापालिकेचे सर्व्हेअर प्रदीप गावडे आदी विविध विभागाचे अधिकार्यांसह संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, उज्वल पाटील, चंद्रकांत शिर्के, मंगल भारवाड, रमेश फुलोरे, विक्रम रामधरणे, मनहर देसाई, दत्ता मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, कोणत्याही कामाची सुरूवात आपल्यापासून केली पाहिजे. राज्य, केंद्र शासन, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकार्यांनी तंबाखूजन्य व गुटखा खाणे पहिल्यांदा बंद केले पाहिजे. जनजागृतीसाठी विविध उपाय योजले जावेत. कारवाई तर उद्यापासून सुरू होईल. येत्या दोन दिवसात सर्व्हे केले जाईल त्यानंतर धुमधडाक्यात एकाच वेळी कारवाईचा बडगा उगारण्यास प्रारंभ होईल.
महेश झगडे आयुक्त असताना त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी दिली. पनवेल संघर्ष समितीने स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून त्याला पूर्ण पाठिंबा देताना तंबाखू जन्य पदार्थांसह गुटखा विक्रीला मुठमाती देवू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
पोलिसांचे सहकार्य मिळेल
गुटखा विक्रीसह अंमली पदार्थांच्या तस्करीला विरोध केला पाहिजे. तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याने सामाजिक स्वास्थ टिकविण्याची आपणा सर्वांवर जबाबदारी आहे. पनवेल शहर पोलिसांच्या परिक्षेत्रात आपण जेव्हा पोलिस बंदोबस्त मागाल, तेव्हा ते अन्न विभागाला पुरविले जाईल. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या निकषांप्रमाणे कारवाई व्हावी.
– विनोद चव्हाण
(वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल)
रायगडचा कॅन्सरशी लढा
जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांविरोधी मोहिम तीव्र होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील दहा लाख लोकांच्या तोडांची तपासणी केली, दूर्दैवाने त्यात लाखभर लोकांना कर्करोग असल्याचे प्राथमिक तपासणीतून निष्पन्न झाले. ही आकडेवारी प्रचंड धोकादायक आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने कॅन्सरशी लढा देण्याची गरज आहे. संघर्षच्या मोहिमेत आपण सहभागी होवून सामाजिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करू या.
-डॉ. बंसराज लोहारे
(ग्रामीण वैद्यकीय अधिकारी)
अतिक्रमण केलेल्या टपर्या उखडल्या जातील
शहरातील अतिक्रमणे यापूर्वीच उखडली गेली आहेत. महापालिकेची ती मोहिम सुरू आहे. ज्या बेकायदेशिर टपरीवर गुटखा विक्री केली जात आहे. त्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्यानंतर लगेचच ती बेकायदा टपरी तोडून टाकण्याची कारवाई त्याक्षणी केली जाईल, तुम्हाला हव्या त्या वेळी महापालिकेकडून मदत मिळेल.
-प्रदीप गावडे
(सर्व्हेअर, पनवेल महापालिका)
ग्रामीण भागात ग्रामसेवकांची मदत देवू
राज्य शासनाच्या अध्यादेशाचे पालन करताना, ग्रामीण भागात गुटखा विक्री करणार्या टपर्या, दुकानदारांची माहिती ग्रामसेवकांमार्फत केली जाईल. ती माहिती अन्न व औषध प्रशासनाला देवू. तसेच त्यांच्या कारवाई मोहिमेत पनवेल पंचायत समितीचा सहभाग राहिल.
-एल. बी. मोहिते
(सह गटविकास अधिकारी, पंचायत समिती पनवेल)