पालिका प्रभाग समितीच्या बैठकीत जाब विचारणार असल्याचा मनोज मेहेरचा इशारा
दिपक देशमुख
नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात सुरू असलेल्या आधार कार्ड केंद्राचा सावळागोंधळ सुरू असल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. आधार कार्ड केंद्र सुरू केल्यावर प्रसिध्दीचे श्रेय घेण्याचा अनेक नगरसेवकांनी प्रयत्न केला. मात्र आधार कार्ड केंद्र बंद पडले असताना श्रेय घेणारे चमकेश नगरसेवक आता कोठे गेले आहेत असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. आमदार संदीप नाईक यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होवून समाजकार्य करणारे ब प्रभाग समितीचे सदस्य मनोज यशवंत मेहेर पुन्हा एकवार नागरिकांच्या मदतीला धावून गेले आहेत. प्रसिध्दीसाठी श्रेय घेणारे चमकेश नगरसेवक कोठे आणि काम करणारा मनोज मेहेर कोठे याचा प्रत्यय नेरूळवासियांना आज पुन्हा एकवार पहावयास मिळाला आहे.
खासगी संस्थांकडून आधार कार्ड केंद्र बंद झाल्यावर नवी मुंबईकरांची गैरसोय होवू नये म्हणून पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयाच्या माध्यमातून आधार कार्ड केंद्र चालविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे पालिका प्रशासनाचा असताना चमकेश नगरसेवकांनी व राजकीय घटकांनी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आणि याच गोष्टीचा संताप आज आधार कार्ड केंद्रावर जमा झालेल्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होता.
महापालिका प्रशासनाच्या नेरूळ विभाग कार्यालयात दुपारी २ ते सांयकाळी ६ या वेळेत आधार कार्ड केंद्र चालविण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसापासून आधार कार्ड केंद्र बंद पडलेले आहे. लोक सकाळी ११ वाजता येतात व परत जातात. आधार कार्ड केंद्र परत कधी सुरू होणार याची कोणतीही माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात येत नाही. आज अखेरिला पालिका विभाग कार्यालयात आधार कार्डसाठी जमलेल्या लोकांच्या संयम व सहनशीलतेचा उद्रेक झाला. यावेळी ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर, शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार, शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले उपस्थित होते. याबाबत मनोज मेहेर, काशिनाथ पवार व दिलीप आमले यांनी पालिका विभाग अधिकार्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी आपली ही जबाबदारी नसल्याचे सांगत अंग झटकले. ही राज्य सरकारची योजना असुन महापालिकेने केवळ जागा उपलब्ध करून दिली असल्याचे पालिका विभाग अधिकार्यांनी यावेळी सांगितले. मनोज मेहेर यांनी विभाग अधिकार्यांना आधार कार्ड केंद्र बंद आहे, तर तसे फलकावर लिहावे की जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही, लोक ताटकळत बसून राहणार नाही, हेलपाटे मारणार नाहीत असे सांगितले. मनोज मेहेर यांच्या मागणीवर पालिका विभाग अधिकार्यांनी तात्काळ संबंधित मनपा कर्मचार्यांना तशा आशयाची सूचना त्या ठिकाणी लिहीण्यास सांगितले. यावेळी प्रसिध्दीमाध्यमांनी शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार व शिवसेना शाखाप्रमुख दिलीप आमले यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यावर काहीही भाष्य केले नाही. मात्र पालिका विभाग कार्यालयात सुरू असलेल्या आधार कार्डच्या सावळागोंधळाविषयी पालिका प्रभाग समिती बैठकीत जाब विचारणार असल्याचे सांगितले. पालिका विभाग कार्यालयातील आधार कार्ड केंद्रामुळे लोकांची सोय न होता गैरसोय वाढली असल्याचे सांगत मनोज मेहेर यांनी यावेळी आपला संताप व्यक्त केला.
काही दिवसापूर्वी आधार कार्ड केंद्राची वेळ दुपारी दोनची असताना दुपारी पावणे तीन वाजले तरी हे केंद्र सुरू झाले नव्हते. मनोज मेहेर यांनी या ठिकाणी येवून पालिका प्रशासनाला जाब विचारल्यावर तात्काळ हे केंद्र सुरू झाले. आजही आधार कार्डसाठी श्रेय घेणारे चमकेश नगरसेवक लांब असताना मनोज मेहेर नागरिकांच्या मदतीला धावून आल्याचे पहावयास मिळाले. श्रेय घेणार्या चमकेश नगरसेवकांनी मनोज मेहेेर यांच्या कृतीचा आदर्श घ्यावा, मनोज मेहेर काम करून जातो, श्रेय घेत नसल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.