दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून कुकशेत येथील महापालिका शाळेत महिलांकरिता आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. हिवताप, मलेरिया, डेंग्यू, ताप, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींच्या आजाराची तपासणी करण्यात आली. याशिवाय महिलांना गरोदरपणात घ्यावयाच्या काळजीविषयी महिला प्रसुती तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
मंगळवारी दुपारी २ ते ४ या वेळेत पालिका नेरूळ आरोग्य विभागाकडून हे शिबिर राबविण्यात आले. अस्थितज्ज्ञांकडूनही शिबिरार्थीची तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात कुकशेत गाव, सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर सहा व दहामधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता पाटील याही शिबिरात सहभागी होवून महिलांची चौकशी करत होत्या. शिबिरात सहभागी झालेल्या महिलांच्या समस्या, शिबिरात केले जाणारे उपचार व होणारे मार्गदर्शन याविषयी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी स्वत: खातरजमा करून घेतली. शिबिर आयोजनातील सहभागी असलेले मलेरियाचे कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, प्रसुती तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. या शिबिरासाठी महापालिकेच्या नेरूळ येथील नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
अन्य ठिकाणी पालिकेचे कर्मचारी शिबिर राबवितात व निघून जातात. परंतु प्रभाग ८५ मध्ये राबविण्यात येणार्या आरोग्य शिबिराच्या वेळी पालिका कर्मचार्यांना नेहमीच सुखद वागणूक अनुभवयास मिळते. स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील या शिबिरामध्ये पूर्णवेळ सहभागी होवून शिबिरार्थीची तसेच शिबिर आयोजकांची चौकशी करत असतात.