नवी मुंबई :- नवी मुंबईतील सी.आर.झेड. अंतर्गत येणाऱ्या सर्व गावे/गावठाणे, सोसायट्या, इमारती या सी.आर.झेड. मधून वगळण्यात येऊन त्या नियमित करणेसंदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांजकडे मागणी केली होती. गेली अडीच वर्षे सदर बाबींचा पाठपुरावा सातत्याने करण्यात येत होता. सततच्या पाठपुराव्याला यश येऊन सदर प्रश्न मार्गी लागला असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या 100% जमिनी नवी मुंबईच्या विकासासाठी त्यागलेली आहेत. नवी मुंबईतील प्राचीन काळापासुनची असलेली सर्व गावे/गावठाण हे समुद्र किनारी असल्यामुळे सध्याच्या प्रचलित धोरणानुसार सदरची गावे CRZ अंतर्गत येत आहेत. या सर्व गावांचे पूर्वापार अस्तित्व असून त्यानंतर CRZ कायद्याची निर्मिती झाली आहे. त्यामुळे हि सर्व गावे सी.आर.झेड. मधून वगळण्यात येऊन ती नियमित करण्यात येणेसंदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांना दि. 01.08.2016 रोजी मागणी केली होती. त्यानंतर सदर बाबींचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. दि. 23.06.2017 रोजीही मुख्यमंत्री महोदयांसह बैठक पार पडली होती. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश येऊन सदर प्रश्न मार्गी लागला असल्याचे सूत्रांकडून समजते. यामुळे नवी मुंबई क्षेत्रातील सी.आर.झेड. मध्ये अडकलेल्या अनेक इमारती, सोसायट्यांचा पुनर्विकासाचा मार्गही मोकळा होणार असल्याने सर्व स्तरातून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक होत आहे.