‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर करणार प्रभाग समितीच्या बैठकीत प्रशासनावर हल्लाबोल
दिपक देशमुख
नवी मुंबई : सारसोळे गावाच्या नेरूळ सेक्टर दोन-चारमधील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीला गेल्या काही वर्षापासून समस्यांचे ग्रहणच लागले आहे. गेली अनेक वर्षापासून सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीच्या डागडूजीचे काम संथगतीने सुरू आहे . याच स्मशानभूमीत जळणासाठी लागणार्या लाकडासाठी भरपूर जागा उपलब्ध असतानाही लाकडाच्या वखार कंत्राटदाराने थेट स्मशानभूमीतील दफनभूमीच्या जागेवरही लाकडे ठेवल्याने सारसोळेच्या ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सारसोळे ग्रामस्थांच्या तक्रारीवरून ब प्रभाग समितीचे सदस्य व सारसोळेचे ग्रामस्थ मनोज यशवंत मेहेर यांनी सारसोळेच्या शांतीधाम स्मशानभूमीची पाहणी केली. लाकडे ठेवणार्या वखारचालकाने स्मशानभूमीची बाहेरील जागा तर लाकडाने व्यापलेली आहेच, परंतु आतील दफनभूमीचाही ३० टक्के भाग लाकडांनी व्यापल्याचे मनोज मेहेरच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला असून २ फेब्रुवारी रोजी होणार्या प्रभाग समितीच्या बैठकीत पालिका प्रशासनाला याचा जाब विचारण्याचा इशारा मनोज मेहेर यांनी दिला आहे.
या स्मशानभूमीला यापूर्वी कोणतेही नाव नव्हते. ही स्मशानभूमी सारसोळेच्या ग्रामस्थांची असल्याने या स्मशानभूमीला सारसोळे गावचे नाव देण्यात यावे यासाठी सारसोळेचे विकासपर्व म्हणून ओळखल्या जाणार्या मनोज मेहेर यांनी पालिका प्रशासन आणि मंत्रालय दरबारी शेकडो पत्रातून पाठपुरावा केला होता. तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारातही स्मशानभूमीच्या नावासाठी हेलपाटे अनेकदा मारलेे आहेत. पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय घडामोडीमुळे सारसोळे ग्रामस्थांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा मिळावा यासाठी तडकाफडकी या स्मशानभूमीला सारसोळे शांतीधाम स्मशानभूमी असे नाव देण्यात आले. याप्रकरणी कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून नवी मुंबईच्या राजकारणात ओळखल्या जाणार्या सुरज पाटलांचीही भूमिका निर्णायक ठरली. सुरज पाटील हा माणूस शब्द पाळणारा माणूस असल्याची चुणूक या उदाहरणातून पहावयास मिळाली.
सारसोळेच्या शांतीधाम स्मशानभूमीत दोन प्रकार असून एका भागात अग्नि दिला जातो तर दुसर्या भागात दफनाचा कार्यक्रम केला जातो. दफनाच्या जागेवर मयत झालेल्या लहान मुलांचे दफन केले जाते याशिवाय आदिवासी तसेच अन्य हिंदू धर्मातील अन्य जमातीमध्ये माणूस मेल्यावर दफनाची पध्दत आहे, त्यांनाही या ठिकाणी दफन केले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून सारसोळेच्या शांतीधाम स्मशानभूमीचे विकासकाम संथगतीने सुरू आहे. गेली काही वर्षे तर या स्मशानभूमीचे काम रखडलेलेच होते. आता तर स्मशानभूमीच्या बाहेरील भागात आणि अंतर्गत दफनभूमीच्या जागेतही कंत्राटदार असलेल्या वखार चालकांने अतिक्रमण करत लाकडाची साठवणूक केली आहे.
या स्मशानभूमीतील दफनभूमीत आधीच जागा कमी पडत असल्याची तक्रार सारसोळेच्या ग्रामस्थांकडून तसेच अन्य परिसरातून केली जात आहे. दफनासाठी गेल्यावर आधी दफन केलेली हाडे लगेच सापडत असल्याची ओरडही गेल्या काही महिन्यापासून होत आहे. पालिका स्मशानभूमीत लाकडे पुरविणार्या कंत्राटदाराला पालिका प्रशासनाने लाकडे ठेवण्यासाठी सर्व स्मशानभूमीची आंदन दिली आहे काय असा संतप्त प्रश्न मनोज मेहेर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. स्मशानभूमीच्या आतील व बाहेरील जागेत लाकडे ठेवणारा वखारवाला ही लाकडे याच स्मशानभूमीसाठी वापरतो का अन्यत्र वापरतो याचीही पालिका प्रशासनाने चौकशी करणे आवश्यक असल्याचे सांगून आपण उद्याच्या प्रभाग समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून पालिका प्रशासनाकडे विचारणा करणार असल्याचे सुरज पाटील यांनी सांगितले.