नवी मुंबई :- नवी मुंबई वाशी सेक्टर 9 ए येथील भाजी मंडई उभारणीसाठी वर्षाआधीच आमदार निधीतून एक कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग करण्यात आले असतानाही महापालिका सदर भाजी मंडई उभारण्यात दिरंगाई करीत असून पालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या घटकपक्षांचे स्थानिक नगरसेवक तथा माजी उपमहापौर यांच्या विरोधामुळे सदर भाजी मंडई उभारण्याच्या कामामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केला आहे. बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी वाशी सेक्टर-9ए येथील भाजी मंडईचा आज अचानक पाहणी दौरा केला. सदर मार्केट बांधणीकरिता आमदार निधीतून 1 कोटी रुपयांची तरतूद केली असताना स्थानिक नगरसेवकाच्या विरोधामुळे सदर मार्केटचा विकास खुंटला असल्याचे त्यांनी सांगितले. सदर मार्केटचा विकास लवकरात लवकर व्हावा, तसेच तेथिल फेरीवाल्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता सदर पाहणी दौरा केला असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेने फेरीवाल्यांकरिता भूखंड उपलब्ध केला असला तरी त्याकरिता धोरण अजूनही तयार नाही. तेथे कोणतीही सोई-सुविधा पुरविल्या जात नाहीत. येथे सुमारे शेकडो फेरीवाले व्यवसाय करीत असून येथील प्रत्येक फेरीवाला सुविधांपासून वंचित आहे. प्रत्येक पक्षाचे व्यापारी येथे व्यवसाय करत असून सदर मार्केट हे सुसज्ज असे तयार करण्याकरिता आमदार निधीतून रु. 1 कोटी निधी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेला उपलब्ध करून दिला. बरेच वर्षापासून हे फेरीवाले व्यवसाय करीत असून त्यांना सर्व सोई-सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे व तो त्यांना मिळालाच पाहिजे. केवळ स्थानिक नगरसेवकाच्या विरोधामुळे महानगरपलिका सदर मार्केटच्या विकास करण्याकरिता दिरंगाई करीत असल्याचा आरोप बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केला.
याबाबत फेरीवाल्यांची प्रतिक्रिया घेतली असता सदर मार्केटच्या पुनर्विकासाचे काम बरेच वर्षापासून प्रलंबित होते. सत्ताधारी पक्ष जाणून-बुजून कामात अडथळा आणत आहेत. आमच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडे आम्ही भाजी मंडई उभारणीकरिता मागणी केली असता त्यांनी त्वरित आमच्या मार्केटच्या उभारणीकरिता रु. 1 कोटी दिले. असे जलद काम करणाऱ्या कार्यतत्पर आमदार आम्ही पहिल्यांदा पाहिल्या आहेत. त्या आमच्या आधारस्तंभ असून येथील काही स्थानिक नेत्यांचा आम्हाला विनाकारण त्रास होत आहे. आम्ही परवानाधारक फेरीवाले असून येथील स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांच्या आशीर्वादाने विनापरवानाधारक फेरीवालेही येथे व्यवसाय करतात. याच गुंड प्रवृत्तीच्या नेत्याकडून त्रास होत असल्याच्या तक्रारीही येथील फेरीवाल्यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांसकडे केली.
यावेळी विकास सोरटे, उदयवीर सिंग, प्रमिला खडसे, कर्तव्य मोदी, कीर्ती राणा, मस्तान फकीरा, राजेंद्र तायल, महेश दरेकर उपस्थित होते.